‘पर्यटन भवन’ला मुहूर्तच नाही
By Admin | Updated: April 16, 2015 00:03 IST2015-04-15T23:12:51+5:302015-04-16T00:03:00+5:30
पर्यटकांची गैरसोय : दोन वर्षे उद्घाटनाची प्रतीक्षाच..

‘पर्यटन भवन’ला मुहूर्तच नाही
शिवाजी गोरे - दापोली -डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे मूळ गाव आंबडवे येथे येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय दूर व्हावी, या हेतूने शासनाने २५ लाख रुपये खर्च करुन पर्यटक भवन बांधले आहे. या पर्यटक भवनाचे काम २०१३ला पूर्ण होऊनसुद्धा पर्यटक भवन बंद असल्याने आंबडवे येथे येणाऱ्या बाबासाहेबांच्या अनुयायांची सोयीअभावी कुंचबणा होऊ लागली आहे. त्यामुळे हे पर्यटक भवन लवकरच खुले करण्याची मागणी केली आहे. आंबडवे या गावाकडे बाबासाहेबांचे मूळ गाव म्हणून पाहिले जाते. त्यामुळे देश - विदेशातून येथे मोठ्या प्रमाणावर बौद्ध बांधव, अनुयायी, अभ्यासक येऊ लागल्याने भविष्यातील गरज ओळखून तत्कालीन सरकारने २००९ साली आंबडवे येथे २५ लाख रुपये खर्च करुन पर्यटक भवन बांधण्याचा निर्णय घेतला. कामाला मंजुरी मिळाल्यानंतर ६ गुंठे जमिनीत पर्यटक भवनाची इमारत बांधून तयार आहे. परंतु २०१३ पासून या इमारतीच्या उद्घाटनाला मुहूर्त न मिळाल्याने येथे येणाऱ्या पर्यटकांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत आहे. नैसर्गिक विधी, राहण्याची, आंघोळीची गैरसोय होऊ लागली आहे. दरवर्षी ६ डिसेंबर, १४ एप्रिल, ७ फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणावर भाविक याठिकाणी भेट देत आहेत. परंतु येणाऱ्या भाविकांची सोयीऐवजी गैरसोय अधिक होऊ लागली आहे. बाबासाहेबांचे गाव पाहण्यासाठी लोक आसुसलेले असतात. मात्र, येथे आल्यावर येथील दुरवस्था पाहून सरकारच्या उदासीनतेबद्दल नाराजी व्यक्त करीत आहेत.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या गावाला पर्यटनाचा ‘क’ दर्जा दिला. या गावाकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे. मात्र, भारतरत्नचे गाव दुर्लक्षित असल्याचे येथील सोयीसुविधांवरुन लक्षात आले आहे. बाबासाहेबांचे नाव घेऊन सोयीचे राजकारण करणाऱ्या मंडळींना भारतरत्नाच्या गावाचा मात्र विसर पडतोय.
आंबडवे गावाला पर्यटनाचा दर्जा दिल्यानंतर आघाडी सरकारने या गावात पर्यटक भवन बांधण्याचा निर्णय घेतला. रत्नागिरी जिल्ह्याचे तत्कालीन पालकमंत्री सुनील तटकरे, ग्रामविकासमंत्री विजयसिंह मोहिते - पाटील या मंत्र्यांनी आंबडवे गावाला भेट देऊन पर्यटक भवन मंजूर केले. पर्यटक भवनाकरिता २५ लाखांचा निधी मिळाला.
२००९ साली कामाला सुरुवात झाली. २०१२ साली पर्यटक भवनाचे काम पूर्ण झाले. ३ वर्षांपूर्वी इमारतीचे काम पूर्ण होऊनही उद्घाटनाअभावी इमारत बंद आहे. त्यामुळे ‘असून अडचण आणि नसून खोळंबा’ अशीच या इमारतीची अवस्था झाली असल्याचे दिसून येते.
नाराजी...
आंबडवे येथे पर्यटन भवनासाठी २५ लाख रुपये खर्च.
६ गुंठे जमिनीत पर्यटन भवनाची इमारत बांधून तयार.
दरवर्षी ६ डिसेंबर, १४ एप्रिल, ७ फेब्रुवारीला मोठ्या प्रमाणावर भाविक देतात आंबडवेला भेट.
तीन वर्षे उलटूनही भवन अद्याप कुलुपबंदच.
भवन खुले करण्याची मागणी.
इमारतीची अवस्था ‘असून अडचण नसून खोळंबा’.