सौंदळ स्थानकामुळे पर्यटन वाढणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2015 00:31 IST2015-07-16T00:31:07+5:302015-07-16T00:31:07+5:30
राजापूर तालुका : दिवाळीपूर्वी होणार भूमीपूजन

सौंदळ स्थानकामुळे पर्यटन वाढणार
राजापूर : केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभूंनी बहुचर्चित अशा राजापूर तालुक्यातील सौंदळ रेल्वे स्थानकाला मंजुरी दिल्याने कोकण रेल्वेच्या नकाशावर त्याची नोंद होणार आहे, तर खऱ्या अर्थाने बहुसंख्य तालुकावासीयांना मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे. केवळ प्रवासी वाहतूक यादृष्टीने नाही तर पर्यटनाच्या दृष्टीनेदेखील भविष्यात हे स्थानक उपयुक्त ठरणार आहे.
कोकणात रेल्वेचे आगमन झाल्याच्या घटनेला जवळपास दीड दशकाचा कालखंड लोटला. मात्र, विविध भागातील मोठ्या प्रमाणातील जनता आपल्या लगत एखादे स्थानक नसल्याने उपेक्षित राहात होती व तो अनुभव राजापूर तालुक्यातील जनतेने घेतला. अशा सौंदळ स्थानकाची निर्मिती करण्याबाबत मागील बावीस वर्षे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत देशपांडे यांनी सातत्याने उत्तम संघटन कौशल्याच्या जोरावर रेल्वे मंत्रालयाकडे सौंदळ स्थानकाचा पाठपुरावा सुरुच ठेवला होता. तथापी एवढी वर्षे सातत्याने काही ना काही तांत्रिक त्रुटी काढीत वेळ मारून नेण्याचे काम कोकण रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानी चालूच ठेवले होते. पण, आपल्या मागणीला सत्यात उतरविण्यासाठी अधीर झालेल्या देशपांडेंनी त्या अधिकाऱ्यांची डाळ शिजू दिली नाही. अखेर केंद्रीय रेल्वेमंत्र्यांना सौंदळ स्थानकाला मान्यता द्यावीच लागली.
सौंदळ या स्थानकासाठी २५ कोटीचा निधी दिला जाणार असल्याची घोषणा होताच तालुक्याच्या पूर्व परिसरात जंगी स्वागत झाले. आता साधारणत: दसरा ते दिवाळी या दरम्यान सौंदळ स्थानकाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित केला जाईल, तशी तयारी व बोलणी सुरु असल्याची माहिती सौंदळ रेल्वे स्थानक निर्मितीचे संस्थापक अध्यक्ष प्रा. चंद्रकांत देशपांडे यांनी दिली. राजापूर तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणीच सौंदळ स्थानक उभारले जात आहे. मुंबई - गोवा महामार्गापासून ओणीतून आतमध्ये सुमारे ८ ते १० किलोमीटर एवढ्या अंतरावर, तर ओणी - अणुस्कुरा या मार्गाला खेटूनच ते असेल. त्यामुळे प्रवाशांना इथून प्रवास करताना अडचण येणार नाही. सध्याचे राजापूर रोड स्टेशन हे एका टोकाला असल्याने लगतच्या परिसरातील काही गावातील नागरिक वगळता कुणी तेथून प्रवास करायला धजावत नाही. रात्रीच्या जाणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण रेल्वे गाड्यांना जायचे असेल तर तेथे जाण्यासाठी एस. टी.ची सुविधा नाही. त्यामुळे रिक्षाने प्रवास करावा लागतो. रिक्षाचालक ३०० रुपयांपेक्षा जास्त पैसे घेतात, असे आजवरचे चित्र राहिले आहे. त्यामुळे राजापूरवासीयांसह विविध भागातील प्रवाशांना सोयीचे ठरेल, अशा सौंदळ स्थानकाचा पर्याय मिळणार आहे. ओणी पट्ट्यातील तसेच पूर्व विभागातील प्रवासी लगतच्या लांजा तालुक्यातील विलवडे या स्थानकाचा आधार घेतात. तेथे फार मोठी गर्दी उसळते, हे सिद्ध झाले आहे. त्यामुळे भविष्यात तालुक्यातील सर्व प्रवासी सौंदळचाच पर्याय निवडू शकतात. केवळ राजापूर तालुकाच नाही, तर लगतच्या अणुस्कुरा व त्याच्या आजूबाजूच्या प्रवाशांना रेल्वेसाठी थेट कोल्हापूर गाठावे लागते. त्यामुळे तिकडच्या प्रवाशांनादेखील सुलभ प्रवास करण्यासाठी हे स्थानक उपयुक्त ठरु शकणार आहे. (प्रतिनिधी)
राजापूरकरांची होणार सोय
पूर्वेकडे सह्याद्री, तर पश्चिमेला अरबी समुद्र अशा विस्तीर्ण पसरलेल्या राजापूर तालुक्याला विद्यमान क्षणी केवळ एकच रेल्वेस्थानक आहे व तेसुद्धा शहरापासून १८ ते २० किलोमीटर अंतरावर असणाऱ्या सोलये गावी. त्या स्थानकाचा फायदा आजूबाजूच्या १५ ते २० गावांना सोडला, तर उर्वरित राजापूर तालुकावासीय हे विलवडे, रत्नागिरी अशा ठिकाणीच जाऊन रेल्वेने प्रवास करतात, हे मागील काही वर्षांचे चित्र आहे. त्यामुळे राजापूरकरांच्या दृष्टीने सोयीस्कर ठरेल.