फेरफटका - बाळकडू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:31 IST2021-09-11T04:31:40+5:302021-09-11T04:31:40+5:30
परिसरातील मंडळींकडून ७७४ रुपये वर्गणी जमली. मग विलास पेजे कला केंद्रातून श्री. पेजे यांनी मुलांना सुंदर गणेशमूर्ती दिली. मुलांना ...

फेरफटका - बाळकडू
परिसरातील मंडळींकडून ७७४ रुपये वर्गणी जमली. मग विलास पेजे कला केंद्रातून श्री. पेजे यांनी मुलांना सुंदर गणेशमूर्ती दिली. मुलांना घेऊन गणेश पूजनाचे साहित्य आणायला गेलो. सर्व साहित्य खरेदी करून डब्यात ७१ रुपये उरले. तर एक मुलगा म्हणाला, ‘‘आपण आता सर्वांनी मिळून उरलेल्या पैशातून बिस्किटे खावू.’’ मला धक्काच बसला. कदाचित त्याच्या बालमनाला असे वाटले असावे. मग सर्वांना पाऊस पडत असतानासुद्धा एका दुकानाच्या शेडमध्ये जमा केले. पैशांचा डबा त्या मुलाच्या हाती दिला आणि दुकानात जाऊन चॉकलेट, बिस्किटे आणून खायला दिली. मग त्यांना बोललो, बाळांनो, असं सार्वजनिक पैशातील एक पैसाही आपणासाठी खर्च करण्याचा, त्यातून खाण्याचा असा विचार जरासुद्धा मनात आणायचा नाही.
आता तुम्ही लहान आहात, उद्या मोठे झालात, असे सार्वजनिक पैसे तुमच्याकडे आले आणि त्यातील काही पैसे तुम्ही स्वतःसाठी खर्च केले तर तो भ्रष्टाचार होतो. मग एका मुलाने विचारले, ‘‘सर दोन बिस्किटे खाल्ली तर भ्रष्टाचार कसा होतो?’’ सर्वांनाच समजावलं, ‘‘तुम्ही सार्वजनिक पैशातील एक पैसा खा, दोन बिस्किटे खा नाहीतर लाखो रुपये खा, तो भ्रष्ट आचारच असतो. अशा भ्रष्टाचारी वागण्यामुळे आपला देश प्रगतीपथावर जाणार नाही. आता हे सारे तुमच्या हातात आहे. तेव्हा आजच तुम्ही ठरवा, आम्ही असे वागणार नाही. सार्वजनिक अथवा सरकारी कामातील एकही पैसा खाणार नाही किंवा असा विचारसुद्धा मनात आणणार नाही. तुम्ही माझे हे शब्द आयुष्यभर लक्षात ठेवून वागा. तरच अशा सार्वजनिक उत्सवातील, कामातील भ्रष्टाचार समूळ नष्ट होईल.’’ मुलांना आपण असा बिस्किटे खाण्याचा विचार उगाच व्यक्त केल्याबद्दल पश्चाताप झाला. येताना गाडीतून मुलं गपगप होती. त्यांना हसत म्हणालो, ‘‘हा माझा विचार मनात रुजवा. हे माझे बाळकडू तुम्हाला निश्चित मोठे करेल. त्यामुळे कदाचित तुम्ही श्रीमंत होणार नाही, पण माझ्या राष्ट्राला तुम्ही महान कराल. बाहेर पावसाचा जोरात आवाज असतानासुद्धा मुलांनी माझ्या बोलण्याकडे लक्ष देऊन एका दमात आवाज दिला.’’ एस् सर, त्यावेळी मला खूप आनंद झाला. आजच्या बाळकडूचा निश्चितच या मुलांच्या भावी आयुष्यात फायदा होईल, याचा विश्वास वाटला. आज आपण सर्वांनीच घरादारातील मुलांवर योग्यवेळी सामाजिक बाळकडूचे
संस्कार केले तर आता जी सर्व सामाजिक आणि सरकारी क्षेत्रातील दुरवस्था आहे ती तर निश्चित थांबेल.
- डॉ. गजानन पाटील