आंजर्लेतील देवस्थानचा विषय गाजणार
By Admin | Updated: November 23, 2015 00:32 IST2015-11-22T21:46:33+5:302015-11-23T00:32:28+5:30
सभेत अवमान : महिलेची पोलीस स्थानकात तक्रार दाखल

आंजर्लेतील देवस्थानचा विषय गाजणार
दापोली : दापोली तालुक्यातील आंजर्ले येथील देवस्थानचे कोणत्याही स्वरूपाचे सभासदत्व नसताना नुकत्याच झालेल्या सभेत या महिन्यात सुरू होणाऱ्या उत्सवात संदीप मयेकर यांच्या कुटुंबाला महाप्रसाद, हळदीकुंकू व आमंत्रण पत्रिका न देण्याचा विषय घेण्यात आला. यामुळे सभासद नसतानाही सभेत आपला विषय घेतल्याने हा आपल्या कुटुंबियांना नाहक त्रास देण्याचा प्रकार असल्याचे संपदा मयेकर यांनी पोलीस स्थानकात दिलेल्या तक्रार अर्जात म्हटले आहे.या देवस्थानात सासरे शशिकांत मयेकर हे निर्वतल्यानंतर तीन मुलांच्या कुटुंबापैकी देवस्थानात आपले छोटे दीर संतोष मयेकर यांना आजचे अध्यक्ष आणि तत्कालिन उपाध्यक्षांनी सभासद केले. आपल्या कुटुंबाला या ट्रस्टने कोणत्याही प्रकारे याबाबत सांगितलेले नाही. आपले छोटे दीर देवस्थानच्या सभेला जात होते. नंतर ते सभेला जायचे बंद झाले. दरम्यान, नुकत्याच झालेल्या सभेत माझे पती संदीप मयेकर यांच्या कुटुंबाला कार्तिक उत्सवात देवस्थानच्या एका विश्वस्तांनी महाप्रसाद, हळदीकुंकू आणि आमंत्रण पत्रिका द्यायची नाही असे बंधन घातले आहे. जे आमंत्रण पत्रिका वाटणारे आहेत, त्यांनादेखील हे बंधन घालण्यात आले आहे. संदीप मयेकर यांचे कुटुंब मुलाबाळांसह महाप्रसादाला आले तरी त्यांना हात धरून बाहेर काढावे असा आदेश देण्यात आले आहेत. देवस्थानकडून असहकारात टाकणे, दंड वसूल करणे असे जबरदस्तीचे प्रकार सुरू असल्याचे तक्रारीत म्हटले आहे. (प्रतिनिधी)3
त्रास देण्याचा उद्देश नाही : संदेश भाटकर
देवस्थानचे विश्वस्त संदेश भाटकर यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संवाद साधला. ते म्हणाले की, यापूर्वी मयेकर यांचे वडील देवस्थानात सभासद होते. त्यांचे देहावसान झाल्यानंतर त्यांच्या मुलाला सभासद करून घेण्यात आले. मात्र, तो सभेला उपस्थित राहत नाही. देवस्थानामध्ये होणाऱ्या उत्सवांची मयेकर कुटुंबियांना काहीच देणेघेणे नसल्याचे त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. सभेला उपस्थिती नसताना केवळ उत्सवकाळात मंदिरात महाप्रसादाला हजेरी लावण्याचे काम त्यांच्याकडून करण्यात येते. देवस्थानचा यामागे कोणालाही त्रास देण्याचा उद्देश नसल्याचे त्यांनी सांगितले.