अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकाचे उद्या ऑनलाईन प्रकाशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:22 IST2021-07-10T04:22:06+5:302021-07-10T04:22:06+5:30
रत्नागिरी : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने ’अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या मासिकाचे ऑनलाईन प्रकाशन रविवार, दि. ११ जुलैरोजी ...

अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिकाचे उद्या ऑनलाईन प्रकाशन
रत्नागिरी : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्यावतीने ’अंधश्रद्धा निर्मूलन पत्रिका’ या मासिकाचे ऑनलाईन प्रकाशन रविवार, दि. ११ जुलैरोजी सकाळी अकरा वाजता होणार असल्याची माहिती महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे राज्य सरचिटणीस नितीन राऊत व मासिकाचे संपादक प्रा. डॉ. नितीन शिंदे यांनी दिली.
मासिकाचे प्रकाशन ज्येष्ठ विचारवंत व साहित्यिक डॉ. यशवंत मनोहर (नागपूर) यांच्याहस्ते होणार आहे. अध्यक्षस्थानी राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील असणार आहेत. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचा विचार जनमानसात रुजवण्यासाठी, विवेकी समाज निर्मिती करणे, व्यापक समाजप्रबोधन करणे हा या मासिकाचा उद्देश आहे. आधुनिक काळात अशा मासिकांची गरज ओळखून समितीने हे पाऊल टाकले आहे. उत्तम जोगदंड हे कार्यकारी संपादक आहेत, तर सह संपादक प्रा. एकनाथ पाटील आहेत. प्रा. डॉ. दीपक बाविस्कर, डॉ. श्यामसुंदर मिरजकर, डॉ. मांतेश हिरेमठ हे संपादक मंडळात आहेत. नामवंत मानसोपचार तज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटकर, सुप्रसिद्ध लेखिका संध्या नरे-पवार हे सल्लागार आहेत. व्यवस्थापकीय जबाबदारी अवधूत कांबळे सांभाळत आहे. महाराष्ट्र अंनिसच्या फेसबुक पेजवर आणि झूमवर हा कार्यक्रम होणार आहे.
कार्यक्रमाचे संयोजन राज्य प्रधान सचिव संजय बनसोडे, सुशिला मुंडे, राज्य सरचिटणीस सुरेखा भापकर, डॉ. ठकसेन गोराणे व कार्यकारी समिती करीत आहे. सोशल मीडिया जबाबदारी नितीन राऊत व नंदकिशोर तळाशीलकर सांभाळणार आहेत. तरी जास्तीत जास्त लोकांनी या ऑनलाईन व फेसबुक लाईव्ह कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन संघटनेने केले आहे.