उक्ताड येथील शौचालयाला ठेकेदाराने दुसऱ्यांदा लावले टाळे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2021 04:22 IST2021-07-02T04:22:21+5:302021-07-02T04:22:21+5:30

चिपळूण : शहरातील उक्ताड - कानसेवाडी येथील शौचालयाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने ...

The toilet at Uktad was locked for the second time by the contractor | उक्ताड येथील शौचालयाला ठेकेदाराने दुसऱ्यांदा लावले टाळे

उक्ताड येथील शौचालयाला ठेकेदाराने दुसऱ्यांदा लावले टाळे

चिपळूण : शहरातील उक्ताड - कानसेवाडी येथील शौचालयाचे काम करणाऱ्या ठेकेदाराला बिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे संबंधित ठेकेदाराने दुसऱ्यावेळी शौचालयाला टाळे लावले आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, उक्ताड - कानसेवाडी येथील शौचालय बांधण्याचे १० लाखांचे काम विकास कन्स्ट्रक्शन या एजन्सीच्या नावे प्रकाश जाधव यांनी घेतले होते. हे काम ६० दिवसात पूर्ण करण्याची मुदत देण्यात आली होती. जुलै २०२०मध्ये काम पूर्ण झाले. नगर परिषदेचे नगर अभियंता परेश पवार यांच्यासह चार इंजिनिअर कामावर देखरेख करत होते. जाधव यांच्याकडून अंदाजपत्रकापेक्षा जास्त काम करून घेण्यात आले. दरम्यान, काम पूर्ण झाल्यानंतर जाधव यांनी बिलाची मागणी केली. मात्र, वर्षभर पाठपुरावा करूनसुद्धा त्यांचे बिल अदा करण्यात आले नाही. त्यामुळे प्रकाश जाधव यांनी शौचालयाला टाळे ठोकले होते.

स्थानिकांनी विनंती केल्यानंतर आणि प्रशासनाकडून बिल देण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद मिळाल्यानंतर त्यांनी शौचालयाचे कुलूप उघडले. त्यानंतरही बिल देण्यात आले नाही. तब्बल एक वर्षानंतर बिल रेकॉर्ड करताना १ लाख ८० हजार रुपये कपात करण्यात आली. दहा लाखांच्या बिलापोटी ८ लाख २० हजार रुपयाचे बिल तयार करण्यात आले. जाधव यांनी जादा केलेल्या कामाचे पैसे देऊ नका पण अंदाजपत्रकानुसार जे काम झाले आहे त्याचे पैसे द्या, अशी मागणी केल्यानंतर झालेल्या कामाएवढेच बिल मिळेल, असे जाधव यांना सांगण्यात आले. त्यामुळे ठेकेदार प्रकाश जाधव यांनी गुरुवारी उक्ताड येथील शौचालयाला पुन्हा टाळे ठोकले आहे.

Web Title: The toilet at Uktad was locked for the second time by the contractor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.