आजची सर्वसाधारण सभा गाजणार?
By Admin | Updated: December 28, 2015 00:43 IST2015-12-27T22:15:10+5:302015-12-28T00:43:13+5:30
जिल्हा परिषद : मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न

आजची सर्वसाधारण सभा गाजणार?
रत्नागिरी : सोमवारी होणारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा विविध विषयांवरून जोरदार गाजणार आहे. या सभेत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना खिंडीत गाठण्याची व्यूहरचना सत्ताधाऱ्यांकडून आखण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेचे पदाधिकारी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांच्यामध्ये गेल्या अनेक दिवसांपासून विविध मुद्द्यांवरून वाद सुरु आहेत. काही दिवसांपूर्वीच निवळी येथील मुख्याध्यापकांच्या निलंबनाच्या प्रश्नावरून जिल्हा परिषदेतील वातावरण तापले होते. हा मुद्दाही जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत गाजण्याची शक्यता आहे.
स्थायी समितीची सभाही विविध अपुऱ्या विषयांमुळे स्थगित करण्यात आली होती. त्यापैकी काही मुद्दे मार्गी लागल्याने नंतर घेण्यात आलेली सभा गाजावाजा न होता आटोपती घेण्यात आली होती.
दरम्यान, काही शिक्षकांनी प्रशासनाकडे पदावनती मागितली होती. त्याचवेळी त्या शिक्षकांनी पदावनतीनंतर अन्य शाळा मागितली होती. याबाबत पदाधिकाऱ्यांनीही त्या शिक्षकांना अन्य शाळा देण्यात यावी, असा निर्णय घेतला होता. मात्र, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तसे न करता त्या शिक्षकांना पदावनतीनंतर त्याच शाळेत ठेवले. त्यामुळे शिक्षकांसह पदाधिकाऱ्यांमध्येही नाराजी पसरलेली आहे.
निवळी तिठा जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापिकेचे तत्काळ निलंबन प्रकरणीही या सोमवारी होणाऱ्या सर्वसाधारण सभेत जोरदार चर्चा होण्याची शक्यता आहे. याशिवाय इतरही विषय असून, ते गाजण्याची शक्यता असून, तशी तयारी सत्ताधाऱ्यांनी केली आहे. त्याचबरोबर अविश्वास ठराव आणण्याच्या दृष्टीने सत्ताधारी असलेल्या शिवसेनेने हालचाली सुरु केल्या आहेत. त्यापूर्वी होणारी ही सर्वसाधारण सभा वादळी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
मागील सर्वसाधारण सभा तीन दिवस चालली होती. त्याप्रमाणेच ही सभाही किती दिवस चालते, याकडे जिल्हावासीयांचे लक्ष लागून राहिले आहे. (शहर वार्ताहर)