शेती अवजारांचे थकीत अनुदान जमा

By Admin | Updated: February 23, 2016 00:36 IST2016-02-23T00:36:01+5:302016-02-23T00:36:01+5:30

दोन वर्षानंतर शेतकऱ्यांना मिळाला न्याय

Tired deposits of agricultural equipment | शेती अवजारांचे थकीत अनुदान जमा

शेती अवजारांचे थकीत अनुदान जमा

रत्नागिरी : जिल्ह्यातील कृषी विभागाच्या बेजबाबदार कार्यपध्दतीमुळे तब्बल दोन वर्षांपासून थकीत राहिलेले शेती अवजार खरेदीतील ११ लाख ६३ हजार रूपयांचे अनुदान आमदार राजन साळवी यांच्या पाठपुराव्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले आहे.
कृषी विभागाच्या राष्ट्रीय फलोत्पादन योजनेतंर्गत जिल्ह्यातील ६३ शेतकऱ्यांनी ५० टक्के अनुदान तत्वावर पॉवर टीलर व पॉवर स्प्रेअर मिळण्यासाठी विहीत नमुन्यात प्रस्ताव सादर केले होते. संबंधित प्रस्तावांना कृषी विभागाकडून दि. ३ मार्च २०१४ मध्ये मंजुरी मिळाली. त्यानंतर बँकांकडून कर्ज काढून शासन नियुक्त दुकानातूनच शेती अवजारे खरेदी करावीत, या कृषी विभागाच्या अटीनुसार संबंधित शेतकऱ्यांनी अवजारे खरेदी केली.
शेतकऱ्यांच्या बँकेतील खात्यात कृषी विभागाकडून अनुदान जमा न झाल्याने शेतकऱ्यांना स्वत: या अवजारे खरेदीचे हफ्ते भरावे लागत होते. याबाबत तालुका व जिल्हा कृषी विभागाच्या कार्यालयात संबंधित कर्मचारी व अधिकाऱ्यांकडे याबाबत विचारणा केली असता, ८ ते १० दिवसांत खात्यात अनुदान जमा होईल, असे सांगण्यात येत होते. सातत्याने कृषी कार्यालयात संपर्क साधून योग्य प्रतिसाद न मिळाल्याने शेतकऱ्यांनी अखेर जिल्हाधिकारी यांचेकडे तक्रार अर्ज सादर केला. परंतु, यावर कोणतीही कार्यवाही न झाल्याने शेतकऱ्यांनी पुणे येथील महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे येथे अनुदान जमा न झाल्याचे अर्ज दिले. यावर संबंधित कार्यालयाने अनुदानाची रक्कम रत्नागिरी येथे वर्ग केल्याचे स्पष्टीकरण दिले. शेतकऱ्यांनी पुणे येथील कार्यालयाच्या उत्तराचा संदर्भ घेऊन पुन्हा जिल्हा कार्यालयाकडे माहितीच्या अधिकारात माहिती घेतली असता शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यात अनुदान जमा करण्यात आल्याचे सांगण्यात आले.
मात्र, शेतकऱ्यांनी बँकांमधून चौकशी केली असता ६३ पैकी फक्त २० शेतकऱ्यांंच्या खात्यात ही अनुदानाची रक्कम जमा झाल्याचे व उर्वरीत ४३ शेतकऱ्यांना पैसे न मिळाल्याचे निदर्शनास आले. याबाबत शेतकऱ्यांनी तालुका व जिल्हा कृषी कार्यालयाकडे विचारणा केली असता दोन्ही कार्यालयांनी पुन्हा उडवा-उडवीची उत्तरे दिली. अखेर तब्बल दोन वर्षे कृषी विभागाच्या कार्यालयाचे उंबरठे झिजवून थकलेल्या शेतकऱ्यांनी आमदार राजन साळवी यांची भेट घेऊन माहिती दिली.
आमदार साळवी यांनी कृषी कार्यालयाकडे पाठपुरावा केल्याने उर्वरीत ४३ शेतकऱ्यांच्या खात्यात नुकतीच ११ लाख ६३ हजार ४६७ रुपये अनुदानाची रक्कम जमा झाली. (प्रतिनिधी)
४११ लाख ६३ हजार रुपयांचे अनुदान.
४कृषी विभागाच्या बेजबाबदार कार्यपध्दतीमुळे दोन वर्षांपासून अनुदान थकीत.
४शेतकऱ्यांच्या खात्यात अखेर जमा.

Web Title: Tired deposits of agricultural equipment