आधी रत्नागिरी जिल्ह्याची तहान भागवा
By Admin | Updated: September 26, 2015 00:21 IST2015-09-25T23:37:09+5:302015-09-26T00:21:25+5:30
रफीक मोडक : कोयनेचे अवजल मुंबईला नेल्यास जनआंदोलनाचा इशारा

आधी रत्नागिरी जिल्ह्याची तहान भागवा
चिपळूण : कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकार यांच्या हालचाली सुरु आहेत. गेली अनेक वर्ष रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांशी भाग पाण्याविना तहानलेलाच आहे. असंख्य गावे तहानलेली असताना जर कोयनेचे पाणी मुंबईत नेले जात असेल तर येथील जनता गप्प बसणार नाही. कोयनेच्या वाया जाणाऱ्या पाण्यावर संपूर्ण जिल्ह्याची गरज भागवण्याची योजना प्रथम शासनाने तयार करणे गरजेचे आहे, असे मत रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव रफीक मोडक यांनी मांडले.
ज्या ठिकाणी पाण्याचे दुर्भिक्ष्य आहे अशा ठिकाणी असणाऱ्या नद्यांना, कोयनेचे पाणी डिसेंबरपासून पुढे सोडल्यास त्या नद्यांना उन्हाळ्यातही पाणी राहून लगतच्या विहिरींतही पाण्याचा तुटवडा जाणवणार नाही. त्यामुळे लगतच्या परिसरातील पाण्याची समस्या दूर होईल. या प्रकारची योजना संपूर्ण रत्नागिरी जिल्हाभर राबवून संपूर्ण जिल्हा १०० टक्के टँकरमुक्त केल्याशिवाय कोयनेचे पाणी मुंबईला नेऊ देणार नाही, असे मोडक यांनी सांगितले.कोयनेच्या वीज प्रकल्पावर महाराष्ट्राच्या जास्तीतजास्त भागाला विद्युत पुरवठा केला जातो. हा प्रकल्प कोकणात आहे. परंतु, त्याच कोकणावर विविध मार्गाने अन्याय होत आहे. कोयनेचे पाणी समुद्राला जाऊन मिळालेले चालते पण ते येथील शेतकरी किंवा छोट्या उद्योगांना, सर्वसामान्यांना वापरु दिले जात नाही ही गोष्ट संतापजनक आहे. या गोष्टीचा शासनाने व लोकप्रतिनिधींनी विचार करायला हवा. भविष्याचा विचार करता रत्नागिरी जिल्हा हा फलोत्पादन जिल्हा घोषित केलेला आहे. पाण्याची पुरेशी व्यवस्था नसताना भविष्यात उद्योगांसाठी पाण्याची कमतरता असताना यावर्षीप्रमाणेच पुढे पावसाचे प्रमाण कमी झाल्यास व त्यामुळे कोयना धरण ८० ते ९० टक्केच भरले तर पुढील पाच वर्षात कोयना धरण ५० टक्के पण प्रतिवर्षी भरणार नाही अशावेळी वीजनिर्मितीसाठी वापरलेले पाणी पुन्हा धरणात सोडण्याच्या योजना आताच तयार करण्याची गरज आहे. भविष्यात कोयनेचे वाया जाणारे पाणी मुंबईला नेण्याची घाई न करता प्रथम त्याचा अभ्यास व चर्चा करण्याची गरज आहे. केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी नद्या जोड प्रकल्पाची संकल्पना मांडली होती. त्याप्रमाणे कोयनेचे पाणी नद्यांना उन्हाळ्यात सोडल्यास कोकणातील पाण्याचा प्रश्न बऱ्याच प्रमाणात सुटू शकेल. त्यामुळे कोयनेचे पाणी मुंबईत नेल्यास जन आंदोलन करण्याचा इशारा रत्नागिरी जिल्हा काँग्रेस सचिव रफीक मोडक यांनी दिला आहे. (प्रतिनिधी)
कोयनेचे अवजल मुंबईला नेण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या हालचाली.
संपूर्ण जिल्हा १०० टक्के टॅँकरमुक्त करा.
कोकणावर अन्याय होत असल्याचा आरोप.