पखवाज वादनातून जिल्हाभर त्यांनी घडविले शिष्य!

By Admin | Updated: July 23, 2016 00:22 IST2016-07-22T22:46:49+5:302016-07-23T00:22:35+5:30

परशुराम गुरव : वयाच्या साठीतही ते जिल्हाभर देत आहेत विद्यार्थ्यांना वादनाचे धडे; कलेची आजही तळमळ

Through the fortnight of the play, he made the district the pupil! | पखवाज वादनातून जिल्हाभर त्यांनी घडविले शिष्य!

पखवाज वादनातून जिल्हाभर त्यांनी घडविले शिष्य!

देवरुख : रत्नागिरी जिल्ह्यातील मूळचे राजापूर-भालावली येथील असलेले परशुराम गोविंंद गुरव यांना आजदेखील उत्कृष्ट पखवाजवादक म्हणून ओळखले जाते. आज वयाच्या साठीतदेखील ते जिल्ह्यात अनेक ठिकाणी फिरुन या वाद्याची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांना पखवाज वादनाचे धडे देत आहेत. त्यांनी जिल्ह्यात ३००हून अधिक शिष्य घडविले आहेत.
साधे व्यक्तिमत्त्व आणि परिस्थिती हालाखीची असली तरी त्यांच्या मनात होतकरु विद्यार्थ्यांना वादनाची कला शिकता यावी, याची तळमळ असल्यामुळे त्यांनी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पखवाजवादनाचे प्रशिक्षण वर्ग सुरु केले आहेत. यामध्ये राजापूर - साईनगर, रत्नागिरीतील शिरगाव-बाणेवाडी, विठ्ठल मंदिर, टेेंभ्ये आडकरवाडी, देवरुख पंचमुखी हनुमान मंदिर, निवेबुद्रुक, पाली, लांजा-इंदवटी, पोलतेश्वर, राजापूर - ओणी, पाचल बाजारपेठ गणपती मंदिर, भालावली याठिकाणी ते पखवाज वादनाचे धडे देतात.
सन १९६३ साली गुरव मुंबईला गेले. तेथे शालेय शिक्षण पूर्ण करत असताना गुरव यांनी आपले थोरले बंधू शिवाजी गुरव यांच्या प्रेरणेने १९७० च्या सुमारास गुरुवर्य शंकर मेस्त्री यांचेकडे पखवाज वादनाची कला आत्मसात केली. लहानपणापासूनच घराण्यातून संगीताचे धडे मिळत असल्याने गुरव यांना ही कला आत्मसात करण्यास वेळ लागला नाही. त्यानंतर त्यांनी ही कला उत्तमप्रकारे आत्मसात करत मुंबई, रत्नागिरी, सिंंधुदुर्ग, आदी भागातील नामवंत भजनीबुवांना डबलबारी भजनातून साथ देत आपली कला रसिकांच्या मनात रुजवली.
गुरव यांनी परशुराम पांचाळ, विलास पाटील, श्रीधर मुणगेकर, गणपत लाड, गुरुदत्त हळबे, गणपत लाड, प्रकाश शिंदे, कै. रामचंद्र गवस, कै. बाबुराव कळंबे, कै. बाळकृष्ण धुरी, काशिनाथ परब, गणपत मोंडकर, सुरेश राणे, कृष्णा पाटील, रत्नागिरीतील दशरथबुवा मयेकर, संदेश पाटणकर, जगन्नाथ बेर्डे, राजन परब, संतोष आरवकर, संजय सुर्वे, सुभाष खाडे, आनंद तेंडोलकर, तुकाराम गुरव, कैलास भोसले, संजय तारळकर, आबा घाडी, विनोद पाटील, मधुकर गुरव, काका गुरव, देवजी गुरव, समीर आंब्रे, रवींद्र गुरव, अशोक सुर्वे, विनायक डोंगरे, दिलीप हरचकर, आदी नामवंत भजनीबुवांना आपल्या वाद्यकलेची उत्तम साथ देत रसिकांची मने जिंंकली आहेत. भालावली येथे वास्तव्यास असतानाही आज वयाच्या साठीतही ते रत्नागिरी, राजापूर, आडिवरे, लांजा, संगमेश्वर, देवरुख, पाली, पाचल आदी ठिकाणी फिरुन विद्यार्थ्यांना पखवाज वादनाचे धडे देत आहेत. (प्रतिनिधी)


सत्कार सोहळ्याचे आयोजन
गुरुपौणिमेचे औचित्य साधून परशुराम गुरव यांच्या सत्काराचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, २४ जुलै रोजी महाड व रविवार, १४ आॅगस्ट रोजी रत्नागिरी येथे गुरव यांच्या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्याला त्यांच्या शिष्यवर्गाने व सर्व भजनप्रेमींनी बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Through the fortnight of the play, he made the district the pupil!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.