ट्रकच्या धडकेत एस.टी.तील ४ प्रवासी जागीच ठार मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
By Admin | Updated: May 15, 2014 00:29 IST2014-05-15T00:29:25+5:302014-05-15T00:29:41+5:30
रत्नागिरी : ट्रकची धडक बसल्याने एस्.टी.ची उजवी बाजू कापत गेली आणि एस्. टी.तील चार प्रवासी जागीच ठार झाले आणि ट्रकचालकासह १२जण गंभीर जखमी झाले.

ट्रकच्या धडकेत एस.टी.तील ४ प्रवासी जागीच ठार मृतांमध्ये तीन महिलांचा समावेश
रत्नागिरी : ट्रकची धडक बसल्याने एस्.टी.ची उजवी बाजू कापत गेली आणि एस्. टी.तील चार प्रवासी जागीच ठार झाले आणि ट्रकचालकासह १२जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये तीन महिला असून, त्यात एका १३ वर्षीय युवतीचाही समावेश आहे. बसमधील सीटवर बसल्या जागीच या प्रवाशांचा झालेला मृत्यू सार्यांच्याच धक्का देणारा होता. मृतदेह पाहणार्याचा थरकाप उडवणारा हा अपघात रत्नागिरी तालुक्यातील पालीनजीकच्या नागलेवाडी येथे आज बुधवारी दुपारी ३.१५ वाजण्याच्या सुमारास घडला. सदरची बस रत्नागिरीहून कोल्हापूरला जात होती. ट्रकची धडक इतकी जबरदस्त होती की मागे फेकल्या गेलेल्या बसची अन्य दोन वाहनांना धडक बसली. त्यांचेही नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावर दुतर्फा गाड्यांची रांग लागली होती. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची नावे गायत्री दीपक भालेराव (१३) व दीपाली योगेश भालेराव (३२, रा. लोणार, जि. बुलढाणा), सुनिता शंकर गार्डी (६२, धनावडेवाडी, देवळे, ता. रत्नागिरी) अशी आहेत. मृत्यूमुखी पडलेल्या एका पुरूषाची ओळख पटलेली नाही. गंभीर जखमी झालेल्यांमध्ये योगेश बाळकृष्ण भालेराव (३६) व अंकिता गोविंद दलाल (१९, दोघेही रा. लोणार, जि. बुलढाणा), शंकर गोपाळ गार्डी (६६), शशिकुमार शंकर गार्डी (३६) व शिल्पा शशिकुमार गार्डी (३२, तिघेही रा. धनावडेवाडी, देवळे, ता. रत्नागिरी), तातोबा हरी पाटील (५५, रा. शिराळा, कोल्हापूर), रेखा प्रकाश कुंभार (३५, रा. नाणीज, ता. रत्नागिरी), राजाराम सोनू आखाडे (४२, रा. तरवळ, रत्नागिरी), बसचालक संजय महादेव सावंत (मलकापूर), महिला वाहक दिलशान मुसारी बागवान (कोल्हापूर आगार), ट्रकचालक मंजुल मुबारक हुसैन (४२, रा. उदयपूर, राजस्थान) व अन्य अत्यवस्थ असलेली व नाव न सांगू शकणारी एक महिला यांचा समावेश आहे. मृतदेह व जखमींना जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज संस्थान नाणीजच्या रुग्णवाहिकेतून रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात आणले गेले. साखरपामार्गे कोल्हापूरला जाणारी बस (एमएच ०७सी ९१९३) घेऊन संजय सावंत दुपारी २.३० वाजता रत्नागिरीतून निघाले होते. हातखंबा येथून पुढे कापडगाव ते चरवेली दरम्यान नागलेवाडी येथील एका अवघड वळणावर समोरून भरधाव वेगाने आलेल्या ट्रकने (आरजे१७जी ०८६९) बसला जोरदार धडक दिली. या ट्रकमधून टायरची वाहतूक केली जात होती. ही धडक इतकी जबरदस्त होती की त्यामुळे बसचा उजवीकडील बहुतांश भाग कापला गेला व बस पाठीमागे फेकली गेली. ट्रकमधील काही टायरही बसवर पडले. ही बस मागून येणारी स्कॉर्पियो (एमएच-२८/ व्ही ७४५५) व मारुती स्विफ्ट (एमएच-२७/ एआर ९१२३) या दोन गाड्यांना धडकली व त्या दोन्ही गाड्यांचेही मोठे नुकसान झाले.