आॅनलाईन वेतन प्रणालीचे तीनतेरा
By Admin | Updated: October 9, 2014 23:02 IST2014-10-09T21:15:32+5:302014-10-09T23:02:11+5:30
अनुदान नाही : पगार लांबणीवर

आॅनलाईन वेतन प्रणालीचे तीनतेरा
टेंभ्ये : सध्या राज्यामध्ये कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी आॅनलाईन वेतन प्रणाली वापरली जात आहे. प्रत्येक महिन्याच्या एक तारखेला कर्मचाऱ्यांना पगार मिळावा, हा या योजनेचा हेतू आहे. रत्नागिरीत मात्र सुरुवातीपासूनच माध्यमिक शिक्षकांच्या पगाराबाबत या योजनेचे तीनतेरा वाजले असल्याचे पाहायला मिळत आहे.
जिल्ह्यात माध्यमिक शिक्षकांचे पगार नेहमीच उशिरा होत असल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच वेळा शासनाकडून अनुदान प्राप्त होत नसल्याने पगार उशिरा होतात. सण वा उत्सवांना कर्मचाऱ्यांना वेळीच पगार मिळावा, यासाठी शासन आग्रही असतानाही रत्नागिरी जिल्ह्यात मात्र माध्यमिक शिक्षकांना असे पगार मिळाल्याची उदाहरणे दुर्मीळ आहेत.
आॅनलाईन वेतन प्रणालीमुळे सर्व कर्मचाऱ्यांना वेळीच पगार मिळणे अपेक्षित आहे. जिल्ह्यात अन्य कर्मचाऱ्यांना या प्रणालीचा फायदा होत असल्याचे दिसून येत आहे. माध्यमिक शिक्षकांच्या बाबतीत मात्र ही प्रणाली पूर्णत: कुचकामी ठरल्याचे दिसून येत आहे. बऱ्याच वेळा शासनाकडून पगार अनुदान वेळीच मिळत नसल्याने शिक्षण विभागासमोर समस्या निर्माण होते. यामुळे पगार लांबणीवर पडतात, असे शिक्षण विभागाचे मत आहे. माध्यमिक शिक्षक हा घटक दुर्लक्षित राहात असल्याचे यातून स्पष्ट होते. सध्या सप्टेंबर महिन्याचा पगार अद्याप मिळालेला नाही. वास्तविक हा पगार दसऱ्याला मिळणे अपेक्षित होते.
एकंदरीत माध्यमिक शिक्षकांचा पगार वेळीच मिळावा, या हेतूने प्रयत्न होणे आवश्यक आहे. सातत्याने हा घटक दुर्लक्षित राहात असल्याने प्रशासनाने याबाबत दखल घेणे गरजेचे आहे. (वार्ताहर)
माध्यमिक शिक्षक उपेक्षित
जिल्हा बँकेच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून शिक्षकांना त्रासदायक वर्तणूक मिळत असल्याची तक्रार अनेक शिक्षकांकडून ऐकायला मिळत आहे. अगदी पासबूक भरण्यापासून ते कॅश घेण्यापर्यंत सर्वच टप्प्यावर शिक्षकांना ताटकळत उभे राहावे लागते. बऱ्याच वेळा कर्मचाऱ्यांकडून शिक्षकांना अपमानजनक वागणूक दिली जात असल्याचे बोलले जात आहे. शिक्षकांच्या पगार खात्याची बँकेला गरज आहे की नाही?