वैद्यकीय सेवेचे तीनतेरा
By Admin | Updated: March 30, 2015 00:25 IST2015-03-29T22:15:25+5:302015-03-30T00:25:52+5:30
फुणगूस केंद्र : आरोग्य व्यवस्थेबाबत सामान्यांमध्ये नाराजी

वैद्यकीय सेवेचे तीनतेरा
फुणगूस : जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या आडमुठ्या धोरणामुळे फुणगूस प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार म्हणजे वाऱ्यावरची वरात झाली आहे. कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांची वानवा असून, सातत्याने रिक्त पदे भरण्याबाबत मागणी करुनही संबंधित यंत्रणेकडून दुर्लक्ष केले जात असल्याने कर्मचाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे खाडीभागातील जनतेच्या संतापाचा पारा चढला असून, याची जिल्हा प्रशासनाने त्वरित दखल न घेतल्यास येथील जनता खाडीभाग हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा ग्रामपंचायत सदस्य अनिल ऊर्फ पप्पू सुर्वे यांनी दिला आहे.सुमारे २० ते २५ गावांतील जनतेच्या रुग्णसेवेसाठी येथील आरोग्य केंद्र हे एकमेव आधार केंद्र आहे. या आरोग्य केंद्राच्या क्षेत्राचा विस्तार तसेच रुग्णसंख्या पाहता येथे कित्येक वर्षे कर्मचाऱ्यांची वानवा आहे. काही महिन्यांपूर्वी डॉ. अंकुश वानखडे यांची गडचिरोली येथे प्रशासकीय बदली झाल्यानंतर एकमेव कार्यरत असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना रुग्ण तपासणीसह शालेय विद्यार्थी तपासणी, उपकेंद्र भेटी, कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया कॅम्प, तालुका तसेच जिल्हा सभा आदी केंद्रबाह्य कामांसाठी जावे लागते. मैलोन्मैल अंतरावरुन येणाऱ्या रुग्णांना बऱ्याच वेळा वैद्यकीय अधिकाऱ्यांची प्रतीक्षा करीत ताटकळत राहावे लागते, तर काही वेळा हिरमुसले होत तालुक्याच्या ठिकाणी धाव घ्यावी लागते.
या भागात जवळपास खासगी वा शासकीय दवाखाना नसल्याने प्रसुतीसाठी येणाऱ्या महिलांना आरोग्यकेंद्र हेच एकमेव आधारस्तंभ आहे. परंतु मुख्यालयी महिला आरोग्यसेविका नसल्याची वर्षभर ओरड आहे.
वैशाली यादव यांच्या प्रशासकीय बदलीचे कर्तव्य पार पाडणाऱ्या संबंधित यंत्रणेला त्यांच्या जागी नवीन नियुक्ती करण्याचा विसर पडला आहे. उपकेंद्र महिला आरोग्य कर्मचाऱ्यांना फिरतीची कामे, सभा आदी कार्यक्रम दिवसभरात आटोपून आळीपाळीने आरोग्य केंद्रात रात्रीच्यावेळी मुख्यालयाचाही कारभार सांभाळावा लागत आहे.
तीच तऱ्हा उपकेंद्रांचीही आहे. पोचरी येथे सुशोभित उपकेंद्राची इमारत असून, येथे सहा ते सात वर्षे पुरुष आरोग्यसेवक तसेच मांजरे येथेही सात ते आठ वर्षे पुरुष आरोग्यसेवक नाही. त्यामुळे येथील लोक गावच्या ठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सेवा तसेच आरोग्यविषयक जनजागृतीपासून वंचित आहेत. येथील ग्रामपंचायत स्तरावरुन ठरावपत्र देण्यात आले. परंतु त्याचीही दखल घेतली गेली नाही. त्यामुळे संपूर्ण खाडीभाग जनतेतून संतापाचा सूर निघत आहे.
आता तरी हा खेळ थांबवावा अन्यथा खाडीभागातील जनता आपला हिसका दाखवल्याशिवाय गप्प बसणार नाही, असा इशारा खाडीभाग येथील ग्रामस्थांच्यावतीने अनिल ऊर्फ पप्पू सुर्वे यांनी दिला आहे. फूणगूसचा हा प्रश्न कायमचा सोडविण्याची मागणी करण्यात आली आहे. (वार्ताहर)