तीन गटशिक्षणाधिकाऱ्यांची उचलबांगडी

By Admin | Updated: April 12, 2015 23:58 IST2015-04-12T21:24:15+5:302015-04-12T23:58:56+5:30

अकार्यक्षमतेचा ठपका : प्रभारींबाबत शिक्षण सभापतींचा महत्त्वपूर्ण निर्णय

Three groups to be removed from the education officer | तीन गटशिक्षणाधिकाऱ्यांची उचलबांगडी

तीन गटशिक्षणाधिकाऱ्यांची उचलबांगडी

रत्नागिरी : जिल्ह्यातील तीन पंचायत समित्यांमध्ये कार्यरत असलेल्या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांची शिक्षण सभापती ऐश्वर्या घोसाळकर यांच्या आदेशाने शिक्षणाधिकाऱ्यांनी उचलबांगडी केली. अकार्यक्षतेचा ठपका ठेवून सभापतींनी हा निर्णय घेतल्याची चर्चा शिक्षकांमध्ये सुरु आहे. प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना तडकाफडकी बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. उचलबांगडी करण्यात आलेल्या प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांमध्ये गुहागर, चिपळूण आणि संगमेश्वर या तीन तालुक्यांचा समावेश आहे. शैक्षणिक दर्जा वाढवण्यासाठी शासनाकडून घोषणाबाजी केली जात असतानाच गेल्या काही महिन्यांपासून जिल्ह्यातील अनेक गटशिक्षणाधिकाऱ्यांची पदे रिक्त आहेत. गुहागर, चिपळूण, संगमेश्वर आणि दापोली येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या पदावर विस्तार अधिकारी प्रभारी म्हणून काम करीत आहेत. गुहागरच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी लीना भागवत यांच्याऐवजी विस्तार अधिकारी इरनाक, चिपळूणच्या प्रभारी गटशिक्षणाधिकारी सशाली मोहितेंच्या जागी विस्तार अधिकारी श्रीधर शिगवण आणि संगमेश्वरचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी प्रदीप पाटील यांना दूर करुन विस्तार अधिकारी सुनील पाटील यांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिक्षणाधिकारी एकनाथ आंबोकर यांनी सांगितले. प्रभारी गटशिक्षणाधिकारी बदलण्याचा निर्णय आपण घेतलेला नाही. शिक्षण सभापतींच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आल्याचे शिक्षणाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या कामाबद्दल शिक्षण समितीच्या मागील सभांमध्येही सभापती व सदस्यांनी नाराजी व्यक्त केली होती. कामे अपूर्ण असल्याने जिल्ह्यातील सर्वच गटशिक्षणाधिकाऱ्यांना नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. एकूणच प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या जागी अन्य विस्तार अधिकाऱ्यांची नियुक्ती करणार असल्याची गेल्या कित्येक दिवसांपासून चर्चा सुरु होती. (शहर वार्ताहर)

Web Title: Three groups to be removed from the education officer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.