कुंभार्ली घाटात बनावट ई - पास प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2021 04:34 IST2021-05-11T04:34:03+5:302021-05-11T04:34:03+5:30
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असल्याने ई - पासच्या माध्यमातून वाहतूक करणाऱ्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. अशातच ...

कुंभार्ली घाटात बनावट ई - पास प्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल
चिपळूण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा बंदी असल्याने ई - पासच्या माध्यमातून वाहतूक करणाऱ्यांची काटेकोरपणे तपासणी केली जात आहे. अशातच चिपळूण - कऱ्हाड मार्गावरील कुंभार्ली घाटातील तपासणी नाक्यावर बनावट ई - पासच्या आधारे प्रवास करताना साेमवारी गाडीचालक पुष्पक नरसिंग शिंदे (वय २४, रा. नांदिवसे, राधानगर, सध्या खेर्डी - दत्तवाडी, चिपळूण) तसेच गाडीचा मालक रोशन सुरेश शिंदे (रा. कळवणे) व सहचालक रेवण दत्तात्रय अडसुळ, (२३, दादर, गावठाण चिपळूण) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोराेनाचा संसर्ग वाढल्याने १५ एप्रिलपासून प्रशासनाने लॉकडाऊन जाहीर केला आहे. या लॉकडाऊनमध्ये नागरिकांच्या संचारावर नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा बंदी लागू करण्यात आली आहे. आंतर जिल्हा प्रवासासाठी ई - पास सेवा नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, ई - पास सुविधेचा काही लोकांनी गैरफायदा घेतल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे अशा लोकांवर गुन्हे दाखल केले जात आहेत.
कुंभार्ली तपासणी येथे पोलीस उपनिरीक्षक धनश्री करंजकर व अलोरे पोलीस स्थानकाचे सहाय्यक पोलीस फौजदार विजय केतकर, पोलीस हवालदार स्वप्निल साळवी, होमगार्ड यशवंत धांगडे, आदित्य कुळे, आरोग्य सेवक मोहिरे, शिक्षक दत्ताराम निर्मल, विलास मायनाक, आदी जिल्ह्यात येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांची तपासणी करीत होते. त्यावेळी कऱ्हाड बाजूकडून रत्नागिरी जिल्ह्यात येणारी इर्टिका गाडी तपासणीसाठी थांबविण्यात आली. गाडीतील व्यक्तीकडे ई - पासची मागणी करून पासवरील क्युआर कोड स्कॅन केला असता, तो बनावट असल्याचा संशय आला. याप्रकरणी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलची मदत घेतली असता तो पास बनावट असल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक धनश्री विष्णू करंजकर यांनी तक्रार दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक संदीप पाटील करीत आहेत.