रत्नागिरी : स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने गुरुवारी रात्री पेट्राेलिंग करताना तिघांना एक लाख ४५ हजार ७५० रुपयांच्या ब्राउन हेराॅईनसह ताब्यात घेतले आहे. ही कारवाई रत्नागिरी शहरातील एकतानगर येथे करण्यात आली.रउफ इक्बाल डोंगरकर (३५, रा. उर्दू स्कूलजवळ कर्ला, रत्नागिरी), नझीर अहमद मोहम्मद वस्ता (३८, रा. वस्ता मोहल्ला राजीवडा, रत्नागिरी) आणि राहिल अजिज सुवर्णदुर्गकर (२९, रा. राजीवडा बांध, रत्नागिरी) अशी ताब्यात घेतलेल्या तिघांची नावे आहेत.पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची पथके तयार करून महत्त्वाच्या ठिकाणी पेट्रोलिंग सुरू केली आहे. हे पथक गुरुवारी शहर परिसरातून पेट्रोलिंग करत असताना त्यांना एकतानगर येथे तिघांच्या हालचाली संशयास्पद दिसल्या. पोलिसांनी त्यांची चौकशी करून तपासणी केली असता त्यांच्याकडून ब्राउन हेरॉईन या अमली पदार्थाच्या ४०५ पुड्या सापडल्या. त्याची किंमत एकूण १ लाख ४५ हजार ७५० रुपये इतकी आहे. या तिघांवर एन. डी. पी. एस. ॲक्ट कलम ८ (क), २१ (ब), २९ अन्वये रत्नागिरी शहर पाेलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद वाघ, पोलिस हेड काॅन्स्टेबल शांताराम झोरे, विजय आंबेकर, दिवराज पाटील आणि विवेक रसाळ यांनी केली.घरफाेड्या, चाेऱ्यांच्या पार्श्वभूमीवर पेट्राेलिंगरत्नागिरी जिल्ह्यामध्ये घरफोड्या व चाेऱ्यांना प्रतिबंध करण्याच्या तसेच अवैध व्यवसायांवर कारवाई करण्याच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करण्याबाबत पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, अतिरिक्त पोलिस अधीक्षक जयश्री गायकवाड यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला सूचना दिल्या होत्या. या सूचनेनुसार पेट्राेलिंग करताना शहरातील एकतानगर येथे अमली पदार्थाचा साठा सापडला.
ब्राउन हेरॉईनसह तिघे ताब्यात, रत्नागिरीत स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2025 14:12 IST