मोबाईल चोरीप्रकरणी रत्नागिरीत तिघांना अटक
By Admin | Updated: August 24, 2014 00:37 IST2014-08-24T00:37:19+5:302014-08-24T00:37:19+5:30
वर्षभरानंतर यश : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

मोबाईल चोरीप्रकरणी रत्नागिरीत तिघांना अटक
रत्नागिरी : शहराजवळील खेडशी येथील दुकानाचे छप्पर फोडून दुकानातील १३ मोबाईल व रोख रक्कमेसह १७ हजार रुपये किंमतीचा ऐवज वर्षभरापूर्वी चोरी केली होती. या चोरीप्रकरणी रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तिघा चोरट्यांना आज शनिवारी अटक केली.
दि. २९ जुलै, २०१३ रोजी रात्री सुशांत सुधीर रसाळ (पाली, ता. रत्नागिरी) यांचे खेडशीनाका येथील मोबाईल दुकानाचे छप्पराचा सिमेंटचा पत्रा कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील १३ मोबाईल हॅण्डसेट व ६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १७ हजार रुपयांचा माल चोरीस गेला होता. त्याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
पोलीस अधिक्षक डॉ. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी मामा कदम, जमीर पटेल, सुशिल पंडीत, उदय वाझे, संदिप मालप, प्रविण बर्गे, गुरु महाडीक, रमिझ शेख, राजू गमरे यांचे खास पोलीस पथक तयार करुन या प्रकरणी चोरट्यांचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत होते. पोलीस अधिक्षक डॉ. शिंदे, पोलीस निरिक्षक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन, पोलीस पथकाने किरण फुंडलिक गोसावी (२०, जाकादेवी, रत्नागिरी), प्रथमेश ऊर्फ संकेत मोहन शिवगण (२२, जाकादेवी, रत्नागिरी) आणि गणेश प्रविण भागवत (१७, पानवल) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून चोरीचे ४ मोबाईल व रोख रक्कम ११ हजार रुपये असा एकूण १५ हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत केला. तसेच आरोपी संकेत शिवगण याचे राहत्या घरातून चायना कंपनीचे अन्य एकूण २१ मोबाईल हॅण्डसेट पोलीसांनी हस्तगत केले. पोलीस तपास करत आहेत. (शहर वार्ताहर)