जिल्ह्यात ‘थर्टीफर्स्ट’चा आज जल्लोष

By Admin | Updated: December 31, 2015 00:28 IST2015-12-30T22:58:22+5:302015-12-31T00:28:36+5:30

पोलीस दल सज्ज : विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन

Threatfirst today in the district to celebrate | जिल्ह्यात ‘थर्टीफर्स्ट’चा आज जल्लोष

जिल्ह्यात ‘थर्टीफर्स्ट’चा आज जल्लोष

रत्नागिरी : सरत्या वर्षाला निरोप देण्याची व नवीन वर्षाच्या स्वागताची जोरदार तयारी जिल्हावासीयांनी केली आहे. थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी रत्नागिरीसह जिल्ह्यातील अन्य शहरांत, किनाऱ्यांवरील हॉटेल्स व परिसरामध्ये विविध मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्ह्यात राज्यभरातून व राज्याबाहेरूनही मोठ्या संख्येने पर्यटकांचे आगमन झाले आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस दल सज्ज झाले आहे. जिल्ह्यातील संवेदनशील ठिकाणांवर पोलिसांनी करडी नजर ठेवली असून, महामार्ग तसेच पर्यटनस्थळांकडे जाणाऱ्या मार्गावरही पोलिसांकडून वाहनांची तपासणी केली जात आहे.
मद्यपी चालकांवर नजर
थर्टीफर्स्टची धूम एकीकडे असतानाच मद्य प्राशन करून वाहने चालवणाऱ्या चालकांसाठी वाहतूक पोलिसांनी जाळे लावले आहे. मद्य पिऊन वाहने चालविणाऱ्यांवर जिल्हाभरात कठोर कारवाई केली जाणार आहे. अल्कोहोल सेवन करणाऱ्यांची तपासणी करण्यासाठी जिल्ह्यात ८ मशिन सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. तसेच वाहतुकीची कोठेही कोंडी होणार नाही, याची काळजी वाहतूक पोलीस शाखेतर्फे घेतली जात आहे.
पोलीस वाहतूक शाखा सतर्क
जिल्ह्यात वाहतूक व्यवस्थेवर नियंत्रणासाठी महामार्ग तसेच अन्य मार्गावरही पोलिसांची गस्त सुरू राहणार आहे. वाहतूक शाखेअंतर्गत सुमारे ३० पोलीस कर्मचारी जिल्ह्यात कार्यरत असून, ४ पोलीस अधिकारी वाहतूक नियंत्रणाच्या कामात गुंतले आहेत. मुंबई - गोवा महामार्ग तसेच रत्नागिरी - कोल्हापूर मार्गावरही वाहनांची तपासणी केली जात आहे. काही ठिकाणी पोलीस तपासणी चेकनाकेही कार्यरत आहेत. सागरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतही थर्टीफर्स्टसाठी येणाऱ्यांकडे लक्ष ठेवले जात आहे.
सागरी किनाऱ्यांना पसंती...
थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मोठ्या संख्येने आलेल्या पर्यटकांनी थेट किनारी भागात आपला मोर्चा वळविला आहे. गणपतीपुळे, आरे-वारे, गुहागर या किनाऱ्यांना जास्त पसंती मिळाली असून, तेथे ३१ डिसेंबरला उच्चांकी गर्दी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पुणे, पश्चिम महाराष्ट, विदर्भातूनही पर्यटकांचे जिल्ह्यात आगमन झाले आहे. समुद्र किनाऱ्यांवर रुपेरी वाळूत पहुडण्याचा व सागरी लाटांमध्ये भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटकही सज्ज झाले आहेत.
थर्टीफर्स्टच्या सहली...
डिसेंबर हा शैक्षणिक सहलींचा महिना म्हणून ओळखला जातो. डिसेंबरच्या अखेरीस थर्टीफर्स्ट सेलिब्रेट करण्यासाठी जिल्ह्याबाहेरून सहलींच्या अनेक खासगी बसेसही दाखल झाल्या आहेत. रत्नागिरी शहरात आलेल्या सहलींच्या बसेस पावस व गणपतीपुळे येथे रवाना झाल्या आहेत. शैक्षणिक सहलींशिवाय अनेक गु्रपही थर्टीफर्स्टचा आनंद लुटण्यासाठी जिल्ह्यात आले आहेत.
पर्यटनस्थळे फुलली...
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आलेल्या पर्यटकांमुळे जिल्ह्यातील पर्यटनस्थळे फुलून गेली आहेत. हर्णै, दापोली, केळशी, गुहागर, गणपतीपुळे, डेरवण, कोळीसरे, जयगड, आरे-वारे, रत्नागिरी शहर, तसेच जिल्ह्यातील अन्य पर्यटन स्थळांच्या ठिकाणी पर्यटकांची गर्दी आहे. त्यामुळे त्याठिकाणी असलेले लॉज व घरगुती राहण्याच्या ठिकाणांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे.
खवय्यांसाठी हॉटेल्स सज्ज...
जिल्ह्याबाहेरून आलेल्या पर्यटकांचा विविध चवीचे मासे चाखण्याकडे कल आहे. त्यामुळे जिल्हाभरातील हॉटेल व्यावसायिकही त्यासाठी सज्ज झाले आहेत. सुरमई, पापलेट, बांगडा, सरंगा व अन्य मासे यांची खरेदी हॉटेल व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात केली असून, ३१ डिसेंबरला सकाळीही मासे खरेदी मोठ्या प्रमाणात होणार असल्याचे चित्र आहे. पर्यटकांना थर्टीफर्स्ट सेलिब्रेट करताना कोकणातील चांगल्या चवीची मच्छीकरी व फ्राय मासे चाखता यावेत, याची पूर्ण तयारी करण्यात आली आहे.
पर्यटनस्थळी रोषणाई...
पर्यटकांच्या स्वागतासाठी सज्ज झालेल्या जिल्हावासीयांनी पर्यटनस्थळी कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. हॉटेल्स व परिसरातही आकर्षक रोषणाई करण्यात आली आहे. तसेच काही ठिकाणी रंगीत फटाक्यांची आतषबाजीही केली जाणार आहे. रोषणाईमुळे पर्यटनस्थळांना यात्रेचे स्वरुप आले आहे. शहरी भागांप्रमाणेच ग्रामीण भागांतही तरुणांनी व पर्यटकांनी थर्टीफर्स्टच्या पार्ट्यांचे नियोजन केले आहे.
हॉटेल कामगारांच्या सुट्या रद्द
जिल्ह्यातील पर्यटनाला थर्टीफर्स्टच्या सेलिब्रेशनमुळे अधिक चालना मिळाली असून, जिल्ह्यात आलेल्या पर्यटकांना चांगली सेवा देता यावी म्हणून हॉटेल व्यावसायिकांनी त्यांच्याकडे कार्यरत असलेल्या कामगारांच्या सुट्याही रद्द केल्या आहेत. तसेच या काळात अधिक काम करावे लागणार असल्याने त्याचा अधिक मोबदलाही मिळणार असल्याने कामगारवर्गातही समाधानाचे वातावरण आहे.
वर्षअखेरीस होणाऱ्या जल्लोषाकडे जिल्हा पोलिसांचेही लक्ष आहे. जागता पहारा दिला जात आहे. (प्रतिनिधी)



चार पथके : अवैध मद्य रोखण्याचे प्रयत्न
लांजा, रत्नागिरी शहर, रत्नागिरी ग्रामीण, चिपळूण व खेड पोलीस ठाण्यांच्या कक्षेतील पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची मिळून तीन पथके बनविण्यात आली आहेत. त्यामुळे महामार्गावर पोलीस गस्त कडक करण्यात आली आहे. पाली, चिपळूण व भरणे ही ३ चेकपोस्ट ६ डिसेंबरपासून कार्यरत करण्यात आली.

Web Title: Threatfirst today in the district to celebrate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.