हजारो उमेदवारांना केवळ आठ स्वच्छतागृहे
By Admin | Updated: February 15, 2015 23:39 IST2015-02-15T22:21:37+5:302015-02-15T23:39:48+5:30
चौकशीची मागणी : ‘महासैन्यभरती’च्या नियोजनातील महाचुका नडल्या

हजारो उमेदवारांना केवळ आठ स्वच्छतागृहे
रत्नागिरी : रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियममध्ये ८ फेब्रुवारीपासन सुरू झालेल्या सैनिक भरतीसाठी राज्याच्या अनेक जिल्ह्यातून दररोज हजारो उमेदवार येत आहेत. त्यांच्या निवासाची सोय नाहीच, परंतु या हजारो उमेदवारांसाठी क्रीडांगणाच्या बाहेरच्या बाजुला केवळ ८ स्वच्छतागृहे असल्याने उमेदवार व सुविधांची संख्या यांचे प्रमाण व्यस्त बनले असून, मारुती मंदिर परिसर कचरा व घाणीमुळे बकाल बनला आहे. या स्थितीला आयोजकांच्या नियोजनातील महाचुुकाच जबाबदार आहेत, असा आरोप आता नागरिकांतून होत आहे. ही सैन्यभरती सैनिक जनरल डयुटी, सैनिक टेक्निकल, सैनिक क्लर्क, स्टोअर किपर, सैनिक नर्सिंग असिस्टंट व सैनिक ट्रेड्समन या ट्रेडकरीता ८ फेब्रुवारी २०१५ पासून सुरू झाली असून १८ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. आज सातारा जिल्ह्यातील उमेदवारांची भरती प्रक्रिया झाली. १६ व १७ फेब्रुवारीला उर्वरित महाराष्ट्र, गोवा, गुजरातमधील उमेदवारांची भरती होणार आहे. या दोन्ही दिवशी रत्नागिरीत येणाऱ्या उमेदवारांची संख्या आतापर्यंतच्या संख्येहूनही अधिक असण्याची शक्यता व्यक्त होत आहे. राज्यातील तरुणांची गैरसोय राज्याचाच विषय राहू शकते, परंतु गोवा व गुजरातमधून येणाऱ्या तरुणांची गैरसोय, स्वच्छतागृहे नसणे ही बाब रत्नागिरीची राज्याबाहेर नाचक्की करणारी ठरणार असल्याची चर्चाही आता सुरू झाली आहे. त्यामुळे आयोजक आता सुविधांसाठी केवळ पालिकेकडे बोट दाखवत आहेत. पालिकेनेच घोडचूक केल्याचे भासवत जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न सुरू आहे. (प्रतिनिधी)
पालिकेकडून चार नवीन स्वच्छतागृहांची व्यवस्था
शहरात सैनिक भरतीसाठी येणाऱ्या तरुणांची गैरसोय लक्षात घेऊन रत्नागिरी पालिकेने आज तयार पध्दतीची दोन युनिटस्मध्ये असलेली चार स्वच्छतागृह आज (रविवार) सकाळी शिवाजी स्टेडियमच्या बाहेर बसवण्यात आल्याची माहिती मुख्याधिकारी एम. बी. खोडके यांनी ‘लोकमत’ला दिली. या खास पध्दतीच्या स्वच्छतागृहांसाठी ५ लाखांचा खर्च आला आहे. मारुती मंदिर परिसर व शहरातच भरती प्रक्रिया संपल्यानंतर विशेष स्वच्छता मोहीम राबवली जाणार असल्याचेही खोडके यांनी सांगितले. सैन्यभरती झाल्यानंतर पालिकेला शहरात स्वच्छता मोहीम राबवावी लागणार आहे. हजारोंच्या संख्येने आलेल्या उमेदवारांमुळे शहरातील अनेक भागात कचरा साठला असून, त्याची दुर्गंधी सर्वत्र पसरली आहे.