एक हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
By Admin | Updated: October 8, 2015 00:29 IST2015-10-07T23:42:29+5:302015-10-08T00:29:11+5:30
रत्नागिरी तालुका : ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार

एक हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट
रत्नागिरी : पावसाचे तीन महिने कोरडेच गेले असल्याने संभाव्य पाणी टंचाईची टांगती तलवार जिल्ह््यावर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तहसील प्रशासनाने लोकचळवळीच्या माध्यमातून तालुक्यात १००० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वाटद येथे या बंधाऱ्यांचा शुभारंभ प्रभारी तहसीलदार हेमंत साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. इतरही गावांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे ठरत आहे.संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी तहसीलदार हेमंत साळवी यांनी तालुक्यात १००० वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून १५ आॅक्टोबरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाकडून आर्थिक मदत मिळेल, याची अपेक्षा न करता किमान पाच बंधारे बांधल्यास गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तालुका प्रशासनातर्फे वाटद येथे बंधाऱ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर तोणदे, पाली आदी गावांमध्येही बंधाऱ्यांना सुरूवात झाली आहे. या बंधाऱ्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुका प्रशासनाने घेतली आहे. यासाठी रिकामी पोती काही कंपन्यांतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या विविध गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे असल्याने ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, तसेच ज्यांच्याकडे रिकामी पोती उपलब्ध आहेत, त्यांनी ती पोती तालुका प्रशासनाला उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन प्रभारी तहसीलदार साळवी यांनी केले. (प्रतिनिधी)