‘त्या’ युवकांमुळे लाेटेत माेठा अनर्थ टळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 20, 2021 04:32 IST2021-04-20T04:32:41+5:302021-04-20T04:32:41+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क आवाशी : सूर्याचा प्रखर चटका आणि विविध ज्वलनशील रसायनांचा साठा हाच त्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरला. ...

‘Those’ youths averted a catastrophe in Latte | ‘त्या’ युवकांमुळे लाेटेत माेठा अनर्थ टळला

‘त्या’ युवकांमुळे लाेटेत माेठा अनर्थ टळला

लोकमत न्यूज नेटवर्क

आवाशी : सूर्याचा प्रखर चटका आणि विविध ज्वलनशील रसायनांचा साठा हाच त्या मोठ्या दुर्घटनेला कारणीभूत ठरला. त्या आगीने तिघांचे बळी घेत अन्य सहा जणांना जखमी केल्याने भयभीत झालेल्या उपस्थितांमधून स्थानिक युवकांचे हात मदतकार्यासाठी पुढे आल्याने येथील मोठा अनर्थ टळला. अन्यथा भोपाळची स्थिती निर्माण होण्यास अवधी लागला नसता.

लोटे - परशुराम औद्योगिक वसाहत आणि पंचक्रोशी रविवारी येथील समर्थ इंजिनिअरिंगमध्ये झालेल्या स्फोटाने हादरली. सकाळी सव्वानऊ वाजता झालेल्या स्फोटाने परिसराच्या कानठळ्या बसवत आगीत रूपांतर केले आणि सर्वत्र एकच खळबळ माजली. जवळपास चार तास आगीचे रौद्र रूप आणि धुराच्या लोळांनी संपूर्ण कंपनी वेढली गेली. पंचक्रोशीतील तरुण रहिवाशांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली आणि मिळेल त्या मार्गाने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी जीवाची बाजी लावत प्रयत्न केले. यामध्ये आवाशी, गुणदे, लोटे, पिरलोटे, घाणेखुंट, चिरणीख लवेल, असगणी या गावांतील तरुणांचा समावेश होता.

जीवाचा कसलाही विचार न करता रसायनाने भरलेले शेकडो ड्रम कंपनीतून बाहेर काढण्यासाठी पुढे सरसावलेल्या हातांमध्ये येथील स्थानिक तरुण अनंत माने, सखाराम गोरे, योगेश आखाडे, नारायण कुळे, राजेंद्र बावदाने, दुंडाप्पा देसाई, संदेश आखाडे, संजय जाधव, रहीम खान व संतोष खरातसह विलास खरवते (हा जखमी झाला आहे.) यांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी येथील औद्योगिक महामंडळाच्या अग्निशमन दलाचे केंद्र अधिकारी आनंद परब व त्यांचे सहकारी एका बाजूने खिंड लढवत असताना स्थानिकांनी उचललेली जोखीम पुढील अनर्थ टाळण्यास कारणीभूत ठरली. अन्यथा, कंपनीतील कर्मचाऱ्यांच्यात मृतांचा आकडाही वाढला असता सोबतच लगत असणाऱ्या कंपन्याही आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्या असत्या. तरुणांनी प्रवेशद्वारासमोरील जेवढे ड्रम आगीपासून दूर नेले त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

.....................................

टाकाऊ मटेरियलवर प्रक्रिया

समर्थ इंजिनिअरिंग ही कंपनी लोटे औद्योगिक वसाहतीतील काही नामांकित कंपन्यांमधून टाकाऊ मटेरियलवर प्रक्रिया करण्याचे काम करते. येथील मोठ्या कंपन्यांतून त्यांच्या उत्पादनप्रक्रियेतून निघणाऱ्या बायप्रॉडक्टचे वितरण या समर्थ इंजिनिअरिंग कंपनीला करत असतात. यामध्ये येथील कन्साई नेरोलॅकसह इतर कंपन्यांचाही समावेश आहे. समर्थ इंजिनिअरिंग या कंपनीचा स्वत:चा असा कोणताही उत्पादित होणारा पदार्थ वा रसायन नसून अनेक रसायनमिश्रित असणाऱ्या रसायंनावर प्रक्रिया करून त्यातून वेगवेगळे रसायन स्वतंत्र करण्याचे काम करते. याला डिस्टिलेशन प्लॅण्ट असे संबोधले जाते.

.....................................

ज्वलनशील रसायनांचा समावेश

समर्थ कंपनीत येणाऱ्या या रसायनांमध्ये टोलवीन, आयपीए, मिथेनॉल अशा ज्वलनशील रसायनांचा समावेश असतो. त्यामुळे साहजिकच त्यांच्या आवारात याच व अशा अन्य ज्वलनशील रसायनांचे ड्रम कंपनीत ठेवले जातात व त्यावर प्रक्रिया केली जाते. स्फोट होऊन आग लागली, त्यावेळी अनेक ज्वलनशील रसायनांचे शेकडो ड्रम कंपनीत होते. या ड्रमनी पेट घेतला असता तर माेठा अनर्थ घडला असता.

Web Title: ‘Those’ youths averted a catastrophe in Latte

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.