डॉक्टरला धमकावणाऱ्यास अटक
By Admin | Updated: July 28, 2016 01:18 IST2016-07-28T00:37:18+5:302016-07-28T01:18:30+5:30
जिल्हा रुग्णालयातील प्रकरण : पोलिसांनी पाठलाग करून पकडले

डॉक्टरला धमकावणाऱ्यास अटक
रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील प्रसुती विभागात कामावर असलेल्या डॉक्टरला शिवीगाळ करून धमकावणारा आरोपी आसीम महंमदअली काझी (रा. शिरगाव, रत्नागिरी) याला बुधवारी सकाळी रत्नागिरी रेल्वे स्थानकाजवळ पाठलाग करून पोलिसांनी पकडले. त्याला अटक करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार १२ जुलै २०१६ रोजी रात्री १.३० वाजता शिरगाव, रत्नागिरी येथील एक महिला प्रसुतीसाठी जिल्हा रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी प्रसुतीगृहाच्या कक्षात रुग्णाच्या नातेवाईकांनी गर्दी केली होती. ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी तेथील नर्सेसनी गर्दी कमी करा, बाहेर जा असे बजावले. त्याचा राग येऊन आरोपी आसीम काझी याने तेथे असलेले डॉक्टर सांगवीकर यांना शिवीगाळ केली. त्यांच्याशी झटापट केली व त्यांना मारण्याची धमकी दिली.
त्यामुळे शासकीय कामात व्यत्यय आणला गेला. याबाबत शहर पोलीस ठाण्यात पंधरा दिवसांपूर्वीच आरोपीविरोधात गुन्हा दाखल झाला होता. मात्र आरोपी पसार झाला होता. पोलीस त्याच्या मागावर होते. त्याच्या घरी पोलीस अनेकवेळा जाऊनही तो सापडला नव्हता. बुधवारी शहर पोलीस रेल्वे स्थानकाजवळ गस्त घालत असताना आरोपी आसीम त्यांना तेथे दिसला. त्याला थांबण्यास सांगण्यात आले. मात्र तो पळत सुटला. पोलिसांनी त्याचा पाठलाग केला व त्याला पकडले. आसीम याच्यावर आणखीही एक गुन्हा याआधी दाखल झाला आहे.
आसीमला अटक केल्यानंतर त्याला सायंकाळी येथील न्यायालयात हजर करण्यात आले. त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक भोये याप्रकरणी अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)