‘तो’ काळ देशासाठी समर्पण करणाऱ्यांचा : पाथरे
By Admin | Updated: August 9, 2014 00:34 IST2014-08-08T23:04:45+5:302014-08-09T00:34:56+5:30
क्रांतिदिन विशेष -१९४२ साली सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीने विद्यार्थ्यांमध्येसुद्धा स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत केली

‘तो’ काळ देशासाठी समर्पण करणाऱ्यांचा : पाथरे
शोभना कांबळे - रत्नागिरी -- १९४२ साली सुरू झालेल्या ‘चले जाव’ चळवळीने विद्यार्थ्यांमध्येसुद्धा स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलीत केली होती. तो काळच देशासाठी खऱ्या अर्थाने समर्पित करणाऱ्यांचा होता, असे रत्नागिरीतील स्वांतत्र्यसेनानी आशाताई पाथरे सांगतात. १९४२ साली सुरू झालेल्या चले जाव चळवळीत येथील आशाताई पाथरे यांचा सहभाग होता. त्यावेळी विद्यार्थीदशेत असतानाच त्यांनी या आंदोलनात उडी घेतली. त्यांच्यासोबत असणाऱ्या सर्वच मुलांमध्ये देशभक्तीचे स्पिरीट अगदी ओतप्रोत भरलेले होते. स्वातंत्र्य मिळाल्यास ६७ वर्षे उलटली असली तरी अजूनही या सर्व आठवणींची शिदोरी आशातार्इंच्या सोबत आहे. त्यांना उजाळा देताना त्या अगदी भारावून जातात.
आशाताई त्यावेळी सांगलीच्या विलिंग्डन कॉलेजमध्ये बी. ए. करत होत्या. ९ आॅगस्ट १९४२ ला मुंबईला गवालिया टँकवर म्हणजे आताच्या आझाद हिंद मैदानावर महात्मा गांधींनी ‘छोडो भारत’ची घोषणा केली आणि ब्रिटिश सरकारने सर्व प्रमुख नेत्यांना गजाआड केले. त्यावेळी विद्यार्थीदशेतही देशभक्ती ओतप्रोत भरलेली असे. याबाबतची आठवण सांगताना आशाताई म्हणतात, देशप्रेमाने भारावलेला माझ्या वर्गातील एक मित्र ‘मधू पोंक्षे’ त्यावेळच्या सांगली स्टेशनसमोरील चौकात उभा राहून ब्रिटिशांविरूद्ध भाषण करू लागला. आम्ही सर्व मित्र - मैत्रिणी त्याच्यासोबत होतो. जमाव गोळा झालेला पाहताच ब्रिटिश सरकारचे शस्त्रास्त्रधारी घोडेस्वार आम्हा सर्वांवर चालून आले. मधू मात्र, जराही न डगमगता आपले भाषण करत होता. ब्रिटिश पोलिसांनी जमाव पांगविण्यासाठी प्रखर लाठीहल्ला सुरू केला. मधू पोंक्षेला मारू नये म्हणून आम्ही विद्यार्थ्यांनी त्याच्याभोवती कडे केले होते. पण, आमचे कडे तोडून त्याला बाहेर ओढून पोलीस अमानूषपणे दांडक्याने झोडू लागले. मधू पळतच स्टेशनकडे जात असताना एका दांडक्याचा फटका त्याच्या डोक्यावर बसला आणि तो स्टेशनच्या पायरीवरच बेशुद्ध पडला. डोके फुटल्याने त्यातून रक्ताचा पाट वाहू लागला. तेवढ्यात एक टांगा जात असलेला दिसला. त्याला थांबविले. आमची त्या टांगेवाल्यालाही दया आली आणि त्याने त्याच्या टांग्यातून आम्हाला दवाखान्यात सोडले.
येरवडा येथील कारागृहातही आशातार्इंनी सक्तमजुरीचीही शिक्षा भोगली आहे. यावेळच्या सर्व आठवणीही त्यांना जशाच्या तशा आठवतात. त्यांच्या बरॅकमध्ये यावेळी सातारा येथील सुलोचना जोशी, कुसुम मोकाशी या त्यांच्या मैत्रिणीही होत्या. त्यांच्यासमवेत असणाऱ्या गुन्हेगार महिलांसोबत राहाण्याचे अनुभव अंगावर शहारे निर्माण करणारे असल्याचे आशाताई सांगतात. नऊ महिन्यांच्या गर्भार सुलोचना जोशी हिला ब्रिटिश सरकारने बर्फाच्या गादीवर झोपण्याची शिक्षा दिली. मात्र, देशप्रेमासाठी तिने तीही आनंदाने सोसली. तो काळ देशप्रेमाने भारावलेला होता. एक जोश होता. त्यामुळे चले जाव चळवळीत सर्वच भारतीयांनी झोकून दिले होते. विद्यार्थीवर्गही त्याकाळी देशभक्तीने प्रेरित झाला होता. देशासाठी लढणे, हेच प्रत्येकाचे ध्येय झाले होते, असे आशाताई सांगताना पूर्वीच्या आठवणीत रमून जातात.
आज ९४ वर्षीय आशातार्इं मुलगा अरूण आणि स्नुषा अॅड. विद्या पाथरे तसेच नातू, नात यांच्या समवेत राहतात. त्यांचे पतीही आर्मीत नोकरीला होते. काही वर्षांपूर्वी त्यांचे निधन झाले. मुलाने आणि एकंदरीत घरच्या सर्वच घटक आपली काळजी अतिशय ममतेने घेत असल्याने आपले आरोग्य उत्तम असल्याचे प्रसन्न वदनाने सांगतात. स्वातंत्र्य लढ्याची आठवण निघाली की, त्या अगदी हरखून जातात आणि मग त्याबाबत भरभरून बोलतात. अजूनही त्यांच्या हृदयात क्रांतिदिनाची आठवण जशीच्या तशी ताजी आहे.
अन् भेट होताच मधु पोंक्षेही भारावले...
आशाताई पाथरेंनी ज्यांचे प्राण वाचवले ते देशभक्त मधुकर पोंक्षे यांचे पुण्यात वास्तव्य होते. दहा वर्षांपूर्वी आशातार्इंचे चिरंजीव अरूण पाथरे हे आपल्या मुलाच्या कामानिमित्त पुण्याला गेले होते. त्यावेळी त्यांनाही मधुकर पोंक्षे यांची भेट घेण्याची अतीव इच्छा होती. त्याप्रमाणे ते त्यांच्या निवासस्थानी पोहोचले. ज्यावेळी पोंक्षे यांना आशा पाथरे यांचा मुलगा आपल्याला भेटायला आलाय, हे कळताच त्यांना परमानंद झाला. त्यांनी आपल्या मुलांना जोरजोरात साद घालत बाहेर बोलावले आणि त्यांना सांगितले, अरे, जिने माझा प्राण वाचवला ना, त्या आशा पाथरे यांचा हा मुलगा अन् नातू. यावेळी त्यांच्या चेहऱ्यावर कमालीचा आनंद पसरला होता, अशी आठवण यावेळी अरूण पाथरे यांनी सांगितली. अरूण पाथरे हे बँक आॅफ महाराष्ट्रमध्ये काही वर्षांपूर्वी अधिकारी म्हणून कार्यरत होते, तर अॅड. विद्या पाथरे या आशातार्इंच्या स्नुषा आहेत.