राजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 9, 2021 04:32 IST2021-05-09T04:32:28+5:302021-05-09T04:32:28+5:30

रत्नागिरी : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने वडवली (ता. राजापूर) येथील प्रणील बळिराम चव्हाण यांच्या घरी छापा टाकून सिंगल ...

Thirteen cartridges with guns seized in Rajapur | राजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त

राजापुरात बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त

रत्नागिरी : स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने वडवली (ता. राजापूर) येथील प्रणील बळिराम चव्हाण यांच्या घरी छापा टाकून सिंगल बॅरल बंदुकीसह तेरा काडतुसे जप्त केली. या प्रकरणी प्रणील चव्हाण यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ त्यांना न्यायालयात हजर केले असता एक दिवसाची पोलीस कोठडी झाल्याची माहिती पोलिसांनी प्रेस नोटद्वारे दिली आहे.

गेल्या काही महिन्यांमध्ये जिल्ह्याच्या विविध भागांमध्ये घडलेल्या घटनांमधून बेकायदेशीर आणि विनापरवाना हत्यारांच्या वापरामुळे जीवितहानी झाली आहे़ त्यामुळे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग यांनी या घटनांकडे लक्ष देऊन विनापरवाना बंदुकीचा वापर करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याचे निर्देश स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला दिले होते. त्याप्रमाणे स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाच्या पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुरुवारी (दि. ६) वडवली येथे कारवाई केली. त्यामध्ये चव्हाण यांच्या घरी टाकलेल्या छाप्यामध्ये सिंगल बॅरल बंदुकीसह १३ काडतुसे जप्त करण्यात आली. या प्रकरणी स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे पोलीस अमोल भोसले यांच्या तक्रारीवरून राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, अधिक तपास येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक मधुकर मौळे करीत आहेत.

Web Title: Thirteen cartridges with guns seized in Rajapur