उटंबर-डायरा येथे चोराला पकडले

By Admin | Updated: September 15, 2015 00:02 IST2015-09-14T23:56:42+5:302015-09-15T00:02:57+5:30

हिमतखान दर्गा : रात्रीच्या अंधारात रंगला पाठलागाचा थरार

A thief caught in Urumand-Diara | उटंबर-डायरा येथे चोराला पकडले

उटंबर-डायरा येथे चोराला पकडले

दापोली : दापोली तालुक्यातील उटंबर - डायरा येथील हिमतखान दर्ग्याची दानपेटी फोडून बंद घरात चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अब्दुल रहिमान इस्माईल शेख (२९, गोरेगाव, रायगड) येथील तरुणाला ग्रामस्थांनी पाठलाग करुन पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.
संशयित आरोपी अब्दुल रहेमान इस्माईल शेख गेली दोन दिवस या परिसरात फिरत असताना स्थानिकांना आढळला होता. रविवारी रात्री ९ च्या सुमारास हिमतखान दर्ग्याची दानपेटी फोडली. त्यातील रकमेने समाधान न झाल्याने बंद घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. मात्र, शेजाऱ्यांना काहीतरी आवाज आल्याने शेजाऱ्याने कानोसा घेतला.
बंद घराचा दरवाजा उघडा दिसल्याने आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला असता अंधाराचा फायदा घेऊन चोरटा पळत सुटला. परंतु या गावातील तरुणाने त्याचा पाठलाग करुन पकडले. बराच वेळ रंगलेले हे पाठलागाचे नाट्य ग्रामस्थांनी चोरट्याला पकडल्यानंतरच संपवले. स्थानिकांनी चोरट्याची धुलाई करुन मगच पोलिसांच्या ताब्यात दिले.
चोरट्याला पकडण्यासाठी सागरी सुरक्षा दलाचे प्रकाश खोत, मजीद चौगुले, जाकीर होडेकर, फयाज बोरकर, जहूर झोंबडकर, मकबूल चाऊस यांनी सहकार्य केले.
दापोली तालुक्यात इतर चोऱ्यांशी या चोरट्याचा काही संबंध आहे का? तो एकटाच चोरी करतो की, त्याच्यासोबत अजून काही साथीदार आहेत, याचा दापोली पोलीस कसून शोध घेत आहेत. या प्रकरणाची फिर्याद मकबूल दिनवारे यांनी दिली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी सायंकाळपर्यंत गुन्हा दाखल केला नव्हता. याबाबतचा अधिक तपास दापोलीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळकृष्ण शेलार, आडे दूरक्षेत्राचे अंमलदार सुरेश खरात करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: A thief caught in Urumand-Diara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.