जिल्ह्यात १९ वर्षांत पोलिओचा रुग्ण नाही
By Admin | Updated: January 16, 2015 23:44 IST2015-01-16T23:22:54+5:302015-01-16T23:44:02+5:30
तयारी पूर्ण : लसीकरण मोहीम

जिल्ह्यात १९ वर्षांत पोलिओचा रुग्ण नाही
रत्नागिरी : पोलिओचे उच्चाटन करण्यासाठी १८ जानेवारी व २२ फेब्रुवारी २०१५ रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यावेळी ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस पाजावे, असे आवाहन जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विजयकुमार काळम-पाटील यांनी केले़ तसेच जिल्ह्यात गेल्या १९ वर्षांत एकही पोलिओचा रुग्ण आढळलेला नाही, असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले़ पल्स पोलिओ लसीकरणाचा लाभ जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील १ लाख ४ हजार ४८५ मुलांना मिळणार आहे़ यासाठी जिल्ह्यामध्ये १९५८ लसीकरण केंद्र स्थापन करण्यात आली आहेत़ तसेच रेल्वे स्टेशन, बसस्थानक, आठवडा बाजार या ठिकाणी १४९ ट्रान्झीट टीम ठेवण्यात आलेल्या आहेत़ तसेच १५५ मोबाईल टीम ठेवण्यात आलेल्या आहेत़ या मोहिमेसाठी ४३०५ कर्मचाऱ्यांची लसीकरण केंद्रांवर नियुक्ती करण्यात आलेली आहे़ जिल्ह्यात ११५ वाहने अधिग्रहीत करण्यात आलेली आहेत़, असेही काळम-पाटील यांनी सांगितले़
पोलिओच्या विषाणूमुळे कायमचे अपंगत्व येते. हे विषाणू बराच काळ जिवंत राहतात़ अपंगत्त्वाची अनेक कारणे आहेत़ त्यापैकी पोलिओ हे एक कारण आहे़ म्हणून कर्मचाऱ्यांनी पल्स पोलिओ डोसचे काम शासकीय पध्दतीने न करता आपले मूल असल्याप्रमाणे करा, अशी सूचनाही काळम-पाटील यांनी कर्मचाऱ्यांना दिली आहे़
यावेळी एकही बालक पल्स पोलिओ लसीकरणापासून वंचित राहणार नाही, याची काळजी प्रत्येक पालकाने घ्यावी़ त्यासाठी प्रत्येक बालकाला पल्स पोलिओ डोस द्यावा, असे आवाहन काळम-पाटील यांनी यावेळी केले़ यावेळी प्रभारी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ़ विनित फाळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ़ प्रल्हाद देवकर, माध्यम व प्रसिध्दी अधिकारी श्रीकांत कुलकर्णी व अन्य उपस्थित होते़ (शहर वार्ताहर)