खेडमध्ये निधी नाही; विकास खुंटला
By Admin | Updated: July 10, 2015 22:23 IST2015-07-10T22:23:37+5:302015-07-10T22:23:37+5:30
पर्यावरण समृद्धी : ४९ ग्रामपंचायती पात्र

खेडमध्ये निधी नाही; विकास खुंटला
खेड : तालुक्यातील ११४पैकीकेवळ ४९ ग्रामपंचायती शासनाच्या पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत पात्र ठरल्या आहेत, तर ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव अद्याप रखडले आहेत. निधीअभावी ही स्थिती उद्भवली असल्याचे सांगण्यात येत आहे़
पर्यावरण संतुलित ग्रामसमृध्दी योजनेअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या विविध विकासकामांच्या योजनेतूनच ग्रामपंचायतीअंतर्गत विकास करण्याची शासनाची संकल्पना आहे. अशा कामांच्या माध्यमातून गावाचा विकास साधायचा आहे. पंचायत राज व्यवस्थेतील अखेरचा टप्पा असलेल्या ग्रामीण भागाचा विकास करण्याकडे सध्या राज्य सरकारने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. दोन्ही सरकारने आता गावाचा विकास साधण्याच्या अनेक योजना मूर्त स्वरूपात आणल्याने ग्रामपंचायतींना विशेष अनन्यसाधारण महत्व प्राप्त झाले आहे. गावातील अनेक ठिकाणी पर्यावरणाचा समतोल ढासळत चालला आहे.
याकरिता पोषक वातावरण निर्माण व्हावे, यातूनच ग्रामीण भागाचा विकास होऊन पर्यावरण संतुलन राखणे सोपे व्हावे, या उद्देशाने ही योजना प्रभाविपणे राबविण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे.
या योजनेअंतर्गत खेड तालुक्यातील ११४ ग्रामपंचायती पात्र ठरल्या होत्या. यावरून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे. याच धर्तीवर आता यावर्षी तालुक्यातील ६५ ग्रामपंचायतींचे प्रस्ताव २४ नोव्हेंबर २०१४ रोजी पंचायत समितीमार्फत पाठविण्यात आले होते. मात्र, त्यास अद्याप मंजुरी मिळाली नाही. तिसऱ्या टप्प्यात ४९ ग्रामपंचायती अनुदानासाठी पात्र ठरल्या. मात्र, निधीअभावी त्यांचे हे प्रस्ताव सध्या रखडलेले आहेत. अशा रखडलेल्या प्रस्तावांचे काय करायचे, याबाबत आता वरिष्ठ पातळीवर चर्चा सुरू असून, निधीअभावी ही कामे रोखली जाऊ नयेत, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. खेड तालुक्यातील केवळ ४९ ग्रामपंचायती या योजनेसाठी पात्र ठराव्यात, हे चित्र शोभादायक नसल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)