तीन महिने पोषण आहाराचे धान्यच नाही

By Admin | Updated: August 22, 2014 22:58 IST2014-08-22T22:53:16+5:302014-08-22T22:58:14+5:30

महिला बचतगट अडचणीत : जिल्हा परिषद महिला बालविकास समिती सभेत उघड

There is no food grain for three months | तीन महिने पोषण आहाराचे धान्यच नाही

तीन महिने पोषण आहाराचे धान्यच नाही

सिंधुदुर्गनगरी : जिल्हा पुरवठा विभाग आणि जिल्हा परिषद महिला बालविकास विभागामध्ये समन्वय नसल्याच्या गोंधळामुळे पूरक पोषण आहार शिजवून देणारे महिला बचतगट अडचणीत सापडले आहेत. गेले तीन महिने पोषण आहाराचे धान्यच उपलब्ध नाही. त्यामुळे खुल्या बाजारात महागाईचे धान्य खरेदी करावे लागत असल्याची बाब कुडाळ सभापती शिल्पा घुर्ये यांनी सभेत उघड केली व तत्काळ धान्य पुरवठा करण्याची मागणी केली. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत तत्काळ धान्य पुरवठा केला जाईल अशी ग्वाही सभागृहात देण्यात आली.
जिल्हा परिषद महिला व बालविकास समितीची सभा सभापती श्रावणी नाईक यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी येथील बॅ. नाथ पै सभागृहात पार पडली. यावेळी समिती सदस्या निकिता परब, निकिता तानवडे, वृंदा सारंग, शिल्पा घुर्ये, रुक्मिणी कांदळगांवकर आदी समिती सचिव तसेच महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ, खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. अंगणवाड्यांना पुरविण्यात येणाऱ्या पूरक पोषण आहाराचे धान्य जूनपासून गेले तीन महिने प्राप्त झालेले नाही. त्यामुळे पूरक पोषण आहार शिजविणाऱ्या बचतगटांना आवश्यक असलेले धान्य खुल्या बाजारातून महागाईने खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे गेले तीन महिन्यांचे बचतगटाचे पैसे अडकले आहेत. धान्याचा पुरवठा आणि गेले तीन महिने धान्य खरेदीसाठी खर्च करण्यात आलेले पैसे न मिळाल्यास पूरक पोषण आहार शिजवून देणे बंद करण्याच्या विचारात आहेत.
जिल्हा पुरवठा विभाग आणि जिल्हा परिषद महिला बालविकास विभाग यामध्ये समन्वय नसल्याने होत असलेल्या गोंधळामुळे जिल्ह्यातील महिला बचतगट अडचणीत आले आहेत. याकडे सदस्या शिल्पा घुर्ये यांनी लक्ष वेधले तर धान्य पुरवठा तत्काळ करा अशा सूचना केल्या.
यावेळी जिल्हा परिषद महिला बालविकास विभागाने पुरवठा विभागाकडे ३ लाख ९० हजार रुपये निधी भरला असल्याचे सांगण्यात आले. मात्र, जिल्हा पुरवठा विभागाने या निधीचा अद्याप हिशोब दिलेला नाही असे स्पष्ट केले. हा प्रश्न लवकरच निकाली काढला जाईल असे सोमनाथ रसाळ यांनी स्पष्ट
केले. (प्रतिनिधी)

जिल्ह्यात ८४७ तीव्र कमी वजनाची मुले
जिल्ह्यातील कुपोषण निर्मूलनाचा आढावा घेतला असता जिल्ह्यात ८४७ तीव्र कमी वजनाची मुले तर ५१०० मुले कमी वजनाची असल्याचे उघड झाले. तसेच पूरक पोषण आहाराचा १०० टक्के लाभार्थ्यांना लाभ दिला जात नाही असे स्पष्ट झाले. यावर जिल्हा महिला बालविकास अधिकारी सोमनाथ रसाळ यांनी पूरक पोषण आहार १०० टक्के लाभार्थ्यांना का दिला जात नाही याची योग्य कारणे द्या. तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांचे वजन वाढावे यासाठी करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा प्रत्येक महिन्याला आढावा घ्या. कुपोषित मुलांचे वजन वाढविण्यासाठी प्रयत्न करा. त्यामध्ये कोणताही हलगर्जीपणा करू नका अशा सूचना यावेळी दिल्या.
कर्ली अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा सत्कार
वेंगुर्ले तालुक्यातील कर्ली अंगणवाडीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानांतर्गत सन २०१२-१३ साठी सावित्रीबाई फुले स्वच्छ अंगणवाडी पुरस्कार मिळाल्याबद्दल शुक्रवारी पार पडलेल्या महिला बालविकास समिती सभेत सभापती श्रावणी नाईक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, गुलाबपुष्प, प्रमाणपत्र देऊन अंगणवाडी सेविका प्रगती पिंगुळकर, मदतनीस मनिषा दुधवडकर आणि मुख्य सेविका हेमलता देसाई यांचा सत्कार करण्यात आला. तसेच कर्ली गावच्या माजी सरपंच प्राजक्ता चिपकर, सदस्या लक्ष्मी नेवाळकर यांचाही सत्कार करण्यात आला.

Web Title: There is no food grain for three months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.