गतवर्षीपेक्षा टंचाई कमी
By Admin | Updated: March 31, 2015 00:22 IST2015-03-30T22:37:09+5:302015-03-31T00:22:27+5:30
थोडा दिलासा : अवकाळी पावसाचा असाही परिणाम

गतवर्षीपेक्षा टंचाई कमी
रत्नागिरी : अवकाळी पाऊस पडल्याने गतवर्षीपेक्षा यंदा पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. चालू आठवड्यामध्ये जिल्ह्यात केवळ ४ गावातील ४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु असून, त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवाड्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून कित्येक मैल पायपीट करावी लागते़ येथील जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत़जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही खडकाळ भागामुळे पाणी जमिनीत न मुरता नदी, नाल्यांद्वारे ते समुद्राला मिळते. त्यामुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे़ त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला तो काही प्रमाणात जनतेची तहान भागविणारा ठरला आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाल्याने लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे. अवकाळी पावसाचा परिणाम पाणीटंचाई कमी होण्यावर झाला आहे. आजच्या पाणीटंचाईची स्थिती पाहता गतवर्षीपेक्षा यंदा टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांची संख्या कमी आहे. गतवर्षी ७ गावांतील ७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. चालू स्थितीत जिल्ह्यात केवळ ४ गावातील ४ वाड्यांमध्येच भीषण पाणीटंचाई सुरु आहे. टंचाईग्रस्तांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. त्यामुळे शासनाकडून टंचाईग्रस्तांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यासाठी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. (शहर वार्ताहर)