जिल्ह्यात सहा हजार घरकुले प्रतीक्षेत

By Admin | Updated: August 11, 2014 00:19 IST2014-08-11T00:00:15+5:302014-08-11T00:19:30+5:30

मंजुरीविना काम अडले : पहिल्या टप्प्यात नऊ कोटी रुपये मंजूर

There are six thousand homes waiting for the district | जिल्ह्यात सहा हजार घरकुले प्रतीक्षेत

जिल्ह्यात सहा हजार घरकुले प्रतीक्षेत

रत्नागिरी : इंदिरा आवास व रमाई घरकुल योजनेअंतर्गत सहा हजार कुटुंबीय घरकुलांच्या प्रतीक्षेत आहेत, तर दोन हजार ३९६ घरकुलांना मंजुरी मिळाली आहे. दोन्ही योजनांच्या प्रस्तावांना अद्याप मंजुरीच न मिळाल्याने लाभार्थी अजूनही घरकुलांपासून वंचित आहेत. या दोन्ही योजनांचे नऊ कोटी रुपयांचे अनुदान जिल्हा परिषदेला पहिल्या टप्प्यात शासनाने मंजूर केले आहे.
अनुसूचित जातीच्या व्यक्तींना त्यांच्या बिकट आर्थिक परिस्थितीमुळे स्वत:च्या उत्पन्नातून चांगल्या प्रकारे पक्के घर बांधणे शक्य होत नाही. ग्रामीण भागात बहुतांश अनुसूचित जातीचे लोक हे कच्च्या घरांमध्ये राहतात. नोकरीसाठी ग्रामीण भागातील बहुतांश लोक शहराकडे आले आहेत. शहरातील वाढत्या किमतीमुळे तेथे ते स्वत:चे घर घेऊ शकत नाहीत. पर्यायाने त्यांना झोपडपट्टीमध्ये राहावे लागते.
ग्रामीण व शहरी भागातील अनुसूचित जातीच्या लोकांचे राहणीमान उंचवावे व त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न सुटावा, यासाठी ग्रामीण व शहरी भागामध्ये त्यांच्या स्वत:च्या जागेवर अथवा कच्च्या घरांच्या ठिकाणी या योजनेअंतर्गत पक्के घर बांधून देण्यात येते.
रमाई आवास योजनेसाठी जिल्हाभरातून ३,४८५ प्रस्ताव, तर इंदिरा आवास घरकुल योजनेसाठी पाच हजार ११ प्रस्ताव आले होते. इंदिरा आवास घरकुल योजना केंद्र व राज्य शासनाकडून संयुक्तपणे राबविण्यात येत आहे. या योजनांच्या माध्यमातून घरकुलांसाठी सुरुवातीला ६८ हजार रुपये लाभार्थ्यांना देण्यात येत होते. मात्र, आता एक लाख रुपयांपर्यंत वाढ करण्यात आली आहे. रमाई आवास योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील घरकुलांना ७० हजार रुपये अनुदान दिले जात होते. हे अनुदान घरकुल बांधण्यासाठी अपुरे पडत असल्याने शासनाने त्यामध्ये वाढ करून आता ते एक लाख रुपये केले आहे.
इंदिरा आवास योजनेअंतर्गत पहिल्या टप्प्यात पाच कोटी ४९ लाख रुपये तरतूद करण्यात आली असून, दोन हजार ११ घरकुलांचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत तीन कोटी ८५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ३८५ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही योजनांतून दोन हजार ३९६ घरकुलांना मंजुरी देण्यात आली आहे. या दोन्ही योजनांचे सहा हजार घरकुलांचे प्रस्ताव अजून मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे या सहा हजार कुटुंबीयांना घरकुलांसाठी आणखी प्रतीक्षा करावी लागणार आहे. (शहर वार्ताहर)

Web Title: There are six thousand homes waiting for the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.