लाेकमत न्यूज नेटवर्क
चिपळूण : एकेकाळी उत्तम दर्जाच्या प्रचंड मधाचा खजिना असलेला हा सह्याद्री आज-काल त्या मधासाठी मधमाशांना शोधत आहे. अर्थात सह्याद्रीच्या खोऱ्यामधून मध बनवणाऱ्या मधमाशा गायब आहेत, ही धक्कादायक गोष्ट जागतिक वनदिनाच्या निमित्ताने पुढे आली आहे. महाबळेश्वरच्या कोयना खोऱ्यापासून कसबा संगमेश्वरच्या नायरी खोऱ्यापर्यंतच्या विस्तीर्ण सह्याद्रीच्या खोऱ्यातील उत्तुंग अशा १३ ठिकाणांवरून वन बांधव वनदिन ग्रुपने आयोजित केलेल्या जागतिक वन दिनाच्या निमित्ताने चिपळूणमध्ये एकत्र आले होते.
गतवर्षी ज्येष्ठ खगोलतज्ज्ञ दा. कृ. सोमण यांच्या प्रमुख उपस्थितीत ठरलेला अतिशय आगळावेगळा जागतिक वनदिनाचा कार्यक्रम कोरोनाच्या प्रचंड दडपणाखाली रद्द करावा लागला होता. मात्र, यंदा तो कार्यक्रम वनरंग २०२१ या नावाने चिपळूणमधील स्वातंत्र्यवीर सावरकर हॉलमध्ये अतिशय आगळ्या वेगळ्या पद्धतीने पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालक शैलेंद्र सावंत यांनी दऱ्याखोऱ्यातून आलेल्या वनबांधवांचे स्वागत केले. वनदिन ग्रुपच्या माधवी भागवत यांनी निसर्ग गीत सादर केले. यानंतर भैरवगडच्या पायथ्याशी असलेल्या मंजुत्रीचे दत्ताराम कदम आणि नागेश्वरच्या पायथ्याशी असलेल्या चोरवण्याचे अनिल उतेकर या दोन वनबांधवांच्या हस्ते ‘वनरंग २०२१’चा शुभारंभ करण्यात आला. वनदिन ग्रुपचे समन्वयक योगेश भागवत यांनी प्रास्ताविक केले.
त्यानंतर झालेल्या पहिल्या सत्रामध्ये वन बांधवांनी आपली वैयक्तिक ओळख करून सह्याद्रीच्या भागातील वैशिष्ट्यांची सर्वांना माहिती करून दिली. या सत्राचे संचालन वनदिन ग्रुपचे राम पाटकर आणि नगरसेवक शशिकांत मोदी यांनी केले. दुसऱ्या सत्रामध्ये विविध ठिकाणच्या वन बांधवांची एकूण सोळा जणांची एक समिती तयार करून भविष्यामध्ये सुसंस्कृत पर्यटन आणि वनौषधी आदी विषयांवर काम करण्याचे नक्की झाले. या सत्राचे संचालन वनदिन ग्रुपचे प्रमोद ठसाळे आणि रमेश कवडे यांनी केले. यावेळी वनदिन ग्रुपचे सुनील शिंदे, वीणा परांजपे, ज्येष्ठ पत्रकार काही कैसर देसाई, डॉ. रत्नाकर थत्ते, डॉ. माधवी साठे, मंगेश गोंधळेकर, अपर्णा नातू, नीला पेंडसे, स्वाती देवळेकर, मनीषा आवटी, माजी नगरसेवक विकी नरळकर, निवृत्त तहसीलदार सुरेश जाधव, संदेश किंजळकर, विनय भोळे, उमेश मोहिते उपस्थित होते.