...तर राणीचे चिरंतन स्मारक निर्माण होईल
By Admin | Updated: November 21, 2015 23:59 IST2015-11-21T23:16:55+5:302015-11-21T23:59:42+5:30
विलास कुवळेकर : कोट येथे प्रथमच राणी लक्ष्मीबाई यांची जयंती साजरी

...तर राणीचे चिरंतन स्मारक निर्माण होईल
लांजा : रणरागिणी झाशीच्या राणीचे स्मारक उभारण्यासाठी लोकांनी सरकारकडे मागणी करू नये. ‘गाव करील ते राव काय करील’ या उक्तीनुसार ग्रामस्थांनीच त्यासाठी पुढाकार घ्यावा. राणीने केलेल्या पराक्रमाच्या स्फूर्तीची ज्योत मनात निर्माण होणार असेल, तर चिरंतन स्मारक निर्माण होईल, असे प्रतिपादन लांजा येथील ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. विलास कुवळेकर यांनी येथे केले.
राणी लक्ष्मीबाई यांची जयंती लांजा तालुक्यातील कोट या राणींच्या मूळ गावी समारंभपूर्वक साजरी करण्यात आली. त्यावेळी झालेल्या समारंभात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर दिनकर नेवाळकर, ज्येष्ठ पत्रकार प्रमोद कोनकर, सरपंच जयश्री भुवड, माजी सरपंच शांताराम सुर्वे, कृष्णा आगरे, प्रकाश घडशी, जिल्हा परिषद सदस्य स्वरूपा साळवी आदी उपस्थित होते.
समारंभापूर्वी राणींच्या स्मारकाच्या नियोजित स्थळी प्रतिमेचे पूजन आणि पोवाड्यांचे गायन करण्यात आले. त्यानंतर झालेल्या समारंभात कुवळेकर पुढे म्हणाले की, भारतीय स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या राणी लक्ष्मीबाई म्हणजे तांबे किंवा नेवाळकर घराण्यापुरत्या मर्यादित नाहीत. सर्वांनाच त्यांच्या अनुवंशाचा वारसा आहे. अशा स्वातंत्र्यसेनानींच्या बलिदानाला काळीमा फासण्याचे काम सुरू आहे. अशा स्थितीत त्यांच्या पराक्रमापासून प्रेरणा देण्यासाठी राणींचे उचित स्मारक उभारले गेले पाहिजे. मात्र, त्यासाठी शासनावर अवलंबून राहून चालणार नाही. चांगला विचार करून प्रेरणादायी स्मारक उभारावे, असे ते म्हणाले.
तसेच आज भारत स्वतंत्र झाल्याने आता ब्रिटिशांना हद्दपार करण्याची गरज नाही. मात्र, भ्रष्टाचारासारख्या दुर्गुणांना हद्दपार करण्याची गरज आहे. त्यासाठी प्रेरणा देणारे स्मारक उभारले पाहिजे, असेही कुवळेकर म्हणाले.
माजी सरपंच आबा सुर्वे म्हणाले की, ‘मेरी झाँसी नही दुंगी’ म्हणणाऱ्या राणी लक्ष्मीबार्इंच्या गावात आपण राहत असल्याने आपल्याला त्यांचा अभिमान वाटला पाहिजे. त्यांचा इतिहास लहान मुलांसमोर ठेवला पाहिजे. त्यासाठी त्यांना वाचनाची गोडी लावली पाहिजे. यावेळी रानडे, रामचंद्र डाफळे आदींनीही विचार व्यक्त केले. राजू नेवाळकर यांनी सूत्रसंचालन केले. (प्रतिनिधी)
राणीने ब्रिटिशांविरुद्ध संघर्ष करून स्वातंत्र्यसंग्रामाची ज्योत पेटवली. त्यांचे स्मारक उभारण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ येऊ नये. त्यांचे जिवंत स्मारक उभारण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखण्यासाठी ग्रामस्थांनीच आग्रह धरला पाहिजे. ग्रामस्थांनी मनावर घेतले तर हे स्मारक सहजरित्या उभे राहील. त्यासाठी ग्रामस्थांचा पुढाकार महत्वाचा असल्याचे उपस्थितांनी सांगितले.