...तर त्यांना पक्षातून हाकला : भास्कर जाधव
By Admin | Updated: July 25, 2016 00:48 IST2016-07-25T00:48:49+5:302016-07-25T00:48:49+5:30
राष्ट्रवादीची सभा : रमेश कदम यांना लगावला टोला

...तर त्यांना पक्षातून हाकला : भास्कर जाधव
सावर्डे : ज्या कुणाला वाटत असेल की आपण नाही तर पक्ष वाढणार नाही, अशांना पक्षातून हाकलून द्या, अशा शब्दांत आमदार भास्कर जाधव यांनी माजी आमदार रमेश कदम यांना टोला लगावला. जाधव-कदम यांच्या एकाच व्यासपीठावर येण्यामुळे या सभेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते.
राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यकारिणीची व आजी-माजी लोकप्रतिनिधींची सभा रविवारी सावर्डे वैद्यकीय महाविद्यालयाच्या सभागृहात झाली, त्यावेळी ते बोलत होते.
या सभेत सावर्डे येथे नगरपरिषद, पंचायत समिती, जिल्हा परिषदेच्या निवडणुकीसंदर्भात चर्चा करण्यात आली. मागील महिन्यात झालेल्या सभेनंतर काही काळ शमलेले जाधव आणि कदम यांच्यातील आरोप-प्रत्यारोपांचे वादळ पुन्हा जोरदार घोंगावू लागले होते. त्यानंतर प्रथमच या सभेत दोघेही आमने-सामने आले. त्यामुळे या सभेत काय होणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
जाधव म्हणाले, निवडणुकांमध्ये उमेदवारी मिळविण्यासाठी आपला पक्ष आणि निवडून आल्यावर आमचे आम्ही, आमचा पक्षातील वरिष्ठांशी काही संबंध नाही, अशी भूमिका घेतली जाते. हे चुकीचे आहे. मला निवडणुकीत संधी मिळाली नाही तरी चालेल; पण माझा पक्ष निवडून आला पाहिजे, असा सल्ला जाधव यांनी दिला.
यावेळी रमेश कदम म्हणाले, राष्ट्रवादी पक्षाची स्थापना झाल्यापासून आम्ही पक्षात आहोत. आम्ही अनेक वर्षे पक्षाचे प्रामाणिक काम केले, पक्ष वाढविला. आम्ही पक्षाचे काम करायचे आणि घोषणा ‘यांनी’ करायच्या. याला आम्ही काय समजायचं? आगामी निवडणुकीसाठी त्या-त्या परिसरातील त्या-त्या कार्यकर्त्याकडे उमेदवार निवडीचा हक्क द्या. त्यामुळे प्रत्येक विभागातील कार्यकर्त्यांना आपल्या आवडीचा उमेदवार निवडता येऊ शकतो. कोणी तरी येणार आणि आदेश देणार, तर तेथील कार्यकर्ते नाराज होतात, अशा शब्दांत त्यांनी जाधव यांना प्रत्युत्तर दिले.
यावेळी पक्षाचे प्रभारी आमदार भास्कर जाधव, जिल्हाध्यक्ष शेखर निकम, माजी आमदार रमेश कदम, आमदार संजय कदम, माजी राज्यमंत्री रवींद्र माने, राष्ट्रवादी युवकचे अजित यशवंतराव, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजी चोरगे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष केशव भोसले, शौकत मुकादम, आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
लक्षवेधी
४दोन्ही नेते रमेश कदम आणि भास्कर जाधव एकत्रित सभेला आले आहेत, हा माझ्या कारकिर्दीतील सुवर्णयोग आहे, असे यावेळी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष शेखर निकम म्हणाले.
४राष्ट्रवादीचे नेते शौकत मुकादम यांनीही कदम आणि जाधव यांना एकत्र पाहून माझा ताप गेला, असे सांगितले. आगामी काळात युवकांना संधी द्या. जुन्या व्यक्तींना कितीवेळ संधी द्याल, अशी भूमिका मांडली.
४काँग्रेसने मला पाडल्यावर मी राष्ट्रवादीत आलो; मात्र येथेही तशीच गटबाजी? पक्षाशी निष्ठावंत रहा. उदय सामंत यांच्यासारखे नको, असे राष्ट्रवादीचे मुंबई उपाध्यक्ष केशव भोसले म्हणाले.
४सभेला सुरुवात झाल्यापासून ते सभा संपेपर्यंत भास्कर जाधव व रमेश कदम हे शेजारी बसले होते; पण शेवटपर्यंत ते एकमेकांशी अजिबात बोलले नाहीत.
४सभा चालू असताना आमदार संजय कदम आले. त्यांनी कदम, जाधव यांच्याकडे पाहिले आणि म्हणाले, अरे! आज दोघेही एकदम बाजू-बाजूला!