नाट्यगृह अखेर होणार!

By Admin | Updated: July 24, 2015 00:39 IST2015-07-23T21:55:14+5:302015-07-24T00:39:06+5:30

दापोली नगरपंचायत : सर्वसाधारण सभेत मंजुरी

Theater will finally be held! | नाट्यगृह अखेर होणार!

नाट्यगृह अखेर होणार!

आंजर्ले : अत्याधुनिक नाट्यगृहाचे दापोलीकरांचे स्वप्न पूर्ण करण्याच्या दिशेने दापोली नगरपंचायतीने पहिले पाऊल टाकले आहे. गाडीतळ येथे नाट्यगृह उभारण्यास सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे.
दापोलीला सांस्कृतिक वारसा लाभला आहे. दापोलीकरांची ओळख कलापे्रमी म्हणूनच आहे. या दापोलीत अनेक सांस्कृतिक चळवळी चालवल्या जातात. विविध संस्थांकडून सांस्कृतिक महोत्सव, नाट्य स्पर्धा, एकांकिका स्पर्धा, नृत्य स्पर्धा घेतल्या जातात. नाट्य व सिनेसृष्टीतील अनेक दिग्गज कलाकारांनी दापोलीत आपली कला सादर केली आहे. दापोलीत नाट्यप्रयोग सादर करण्यासाठी अनेक व्यावसायिक नाट्य कलाकार उत्सुक असतात. मात्र, दुर्दैवाने दापोली शहरात अत्याधुनिक सोयींनी युक्त असे नाट्यगृह नाही. सद्यस्थितीत एकच खासगी मालकीचे नाट्यगृह आहे. या नाट्यगृहात अत्याधुनिक सोयीसुविधांचा अभाव आहे.
मात्र, पर्याय नसल्याने याच नाट्यगृहात रसिकांना जावे लागते. दापोली नगरपंचायतीची स्थापना झाल्यानंतर नाट्यगृहाचा विषय चर्चेत आला. गाडीतळ येथे अत्याधुनिक नाट्यगृह उभारण्यासाठी पाहणी करण्यात आली. त्याचबरोबर दापोली शहराचा नगरविकास आराखडा तयार करताना या जागेवर नाट्यगृह व व्यापारी संकुल असे आरक्षण टाकण्यात आले. १३ जुलैला झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक १३ म्हणून हा विषय चर्चेला ठेवण्यात आला. मौजे कॅम्प दापोली स. नं. ३१४ पैकी, सि. स. नं. ९१२ ते ९१६ गाडीतळ येथील आरक्षण क्रमांक ४२ नाट्यगृह व व्यापारी संकुल हे आरक्षण विकसित करण्याबाबत निर्णय घेणे. या विषयावर चर्चा होऊन मंजुरी देण्यात आली.
आता याबाबतचा प्रस्ताव तयार करूनही जागा नगरपंचायतीला मिळावी, यासाठी मागणी केली जाईल. महसूल विभागाकडून या जमिनीचा ताबा मिळाल्यानंतर अंदाजपत्रक तयार करण्यात येईल. त्यानंतर निविदा प्रसिध्द करण्यात येईल. याला थोडा कालावधी जाणार आहे. मात्र, दापोलीत अत्याधुनिक नाट्यगृह उभे राहण्याच्या दृष्टीने पहिले पाऊल पडले आहे. हे नाट्यगृह उभारताना कुशल तज्ज्ञांची मदत घेतली जावी. जेणेकरून जिल्ह्यातील अन्य नाट्यगृहांसारख्या समस्या निर्माण होणार नाहीत. कारण जिल्ह्यात अनेक नाट्यगृहांना समस्यांना सामोरे जावे लागत आहे. या गोष्टी लक्षात घेऊन कोणतीही तांत्रिक उणीव राहणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. ध्वनी, प्रकाशयोजना, बैठक व्यवस्था याचे नियोजन अत्यंत काटेकोरपणे करणे गरजेचे आहे. (प्रतिनिधी)


प्रतिक्षा संपण्याची आशा
जिल्ह्यातील सांस्कृतिक वैभव म्हणून दापोलीची चर्चा होते. या भागात गेली कित्येक वर्षे नाट्यगृह नव्हते. आता नाट्यगृहाची मागणी पूर्ण केली जात असल्याने दापोलीच्या नाट्य संगीत रंगभूमीला उर्जितावस्था येणार आहे. नगरपंचायतीने पुढाकार घेऊन गाडीतळ येथे नाट्यगृह उभारण्याचा निर्णय घेतला आहे. दापोली नगरपंचायतीच्या सर्वसाधारण सभेत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. दापोलीत विविध संस्थांकडून याचे स्वागत होत आहे.

Web Title: Theater will finally be held!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.