रत्नागिरी : अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लादल्यामुळे त्याचा फटका कोकणातील हापूस आमरस (मॅंगो पल्प) निर्यातीला बसणार आहे. या नव्या धोरणामुळे भारतातून अमेरिकेला होणारी आमरसाची निर्यात घटण्याची भीती निर्यातदारांनी व्यक्त केली आहे.भारतातून दरवर्षी १५ हजार मेट्रिक टन आमरसाची निर्यात होते. त्यापैकी ३०० कोटी रुपयांचा आमरस अमेरिकेत जातो. या निर्यातीमध्ये कोकणातील हापूस आमरसचा मोठा वाटा आहे. अमेरिकेत आमरसला वाढती मागणी आहे. कोकणातून दरवर्षी ५० कोटी रुपयांचा आमरस अमेरिकेत निर्यात होत असतो. मात्र, अमेरिकेच्या या टॅरिफमुळे ५० कोटींच्या निर्यातीवर १२.५० कोटी रुपयांचा अतिरिक्त कर लागणार आहे. परिणामी, अमेरिकेतील ग्राहकांनाही आमरससाठी २५ टक्के जास्त किंमत मोजावी लागणार आहे. त्यामुळे आमरसच्या मागणी घट होण्याची शक्यताही नाकारता येत नाही. या नवीन नियमावलीमुळे आंबा प्रक्रिया व्यावसायिकांना झळ बसण्याची शक्यता आहे.
अमेरिकेने भारतावर २५ टक्के टॅरिफ लावला आहे. त्यामुळे कोकणातून निर्यात होणाऱ्या आमरसावर परिणाम होण्याची शक्यता आहे. कोकणातून ५० काेटींचा आमरस निर्यात होतो. मात्र, या ५० कोटींच्या निर्यातीवर लागणाऱ्या अतिरिक्त कराची झळ प्रक्रिया व्यावसायिकांना बसणार आहे. शिवाय अमेरिकेतील आमरस घेणाऱ्या ग्राहकांनाही जास्त किंमत मोजावी लागणार आहे. परिणामी, विक्रीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्र सरकारने यामध्ये लक्ष देत पूर्वीप्रमाणे शून्य टक्के टॅरिफ कर करावा, यासाठी प्रयत्न करावे. - आनंद देसाई, आंबा प्रक्रिया उद्योजक व निर्यातदार, रत्नागिरी