रत्नागिरी : बांगलादेशी नागरिकाला स्थानिक जन्मदाखला दिल्याच्या कारणावरून रत्नागिरी तालुक्यातील शिरगाव येथील तत्कालीन ग्रामविकास अधिकारी वासुदेव सावके याला निलंबित करण्यात आले आहे. बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी ही कारवाई केली. बोगस व्यक्तीला दाखला देताना पद्धतही चुकीची वापरण्यात आली आहे. जन्माच्या ३० दिवसानंतर दाखला देण्याचा अधिकार ग्रामपंचायतीला नाही.एका बांगलादेशी नागरिकाला मुंबई पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याची चौकशी सुरू असताना, त्याला शिरगाव ग्रामपंचायतीने जन्मदाखला दिल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी ग्रामसेवकासह तत्कालीन सरपंच आणि कर्मचाऱ्यांची चौकशी करून तत्काळ अहवाल सादर करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी गटविकास अधिकारी जाधव यांना दिले होते.चौकशी पूर्ण झाल्यानंतर रत्नागिरी पंचायत समितीने आपला अहवाल मुख्य कार्यकारी अधिकारी यांना सादर केला. तत्कालीन ग्रामविकास अधिकाऱ्याने चुकीच्या पद्धतीने दाखला दिल्याचा निष्कर्ष यात काढण्यात आला आहे. या अहवालावरून मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी ग्रामविकास अधिकारी सावके याला निलंबित केले आहे.
कशी होते नोंदबाळाच्या जन्मानंतर ३० दिवसात नोंद होत असेल, तर ती ग्रामपंचायतीचे विस्तार अधिकारी करतात. त्यानंतर एक वर्षापर्यंत नोंद करायची असेल, तर त्याची माहिती गटविकास अधिकाऱ्यांना देऊन त्यांच्या आदेशानंतरच जन्माची नोंद केली जाते. एक वर्षानंतरची नोंद ही न्यायालयाच्या पूर्वपरवानगीने घालता येते, अशी पद्धत असल्याचे रत्नागिरी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी जे. पी. जाधव यांनी सांगितले.
‘त्या’ अधिकाऱ्याचे सर्वच दाखले तपासणारसंबंधित विस्तार अधिकाऱ्याच्या कालखंडातील जन्म-मृत्यू नोंदीचे दप्तर पडताळणीसाठी सहायक गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीला संपूर्ण नोंदीची पडताळणी करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे. त्यामध्ये आणखी कोणाला असे बोगस दाखले देण्यात आले आहेत का, याचीही तपासणी करण्यात येत आहे.