मंडणगड : लोकशाहीने सर्वसामान्यांना बहाल केलेल्या न्याय, शासन व प्रशासन या व्यवस्थांनी समन्वयाने काम केल्यास उत्तम काम उभे राहते. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या संविधानामुळे आज देश विकासाच्या मार्गावर कार्यरत आहे. शेजारील राष्ट्रांशी तुलना करता देश स्थिरपणे विकसित राष्ट्रकाडे प्रगती करीत आहे, असे प्रतिपादन सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे केले.मंडणगड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. याप्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती चंद्रशेखर, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत, उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णिक, पालक न्यायाधीश न्यायमूर्ती माधव जामदार, राज्य ग्राहक तक्रार निवारण आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती एस. पी. तावडे, महसूल राज्यमंत्री योगेश कदम, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश विनोद जाधव, दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) अमृता जोशी, बार असोसिएशनचे अध्यक्ष अमोल सावंत, सदस्य संग्राम देसाई, वकील संघाचे अध्यक्ष मिलिंद लोखंडे, आमदार किरण सामंत, विभागीय आयुक्त विजय सूर्यवंशी, काेकण परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक संजय दराडे, जिल्हाधिकारी मनुज जिंदल उपस्थित होते.सरन्यायाधीश गवई यांच्या हस्ते कळ दाबून न्यायालयाच्या इमारत प्रांगणातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे तसेच म्युरलचे अनावरण करण्यात आले. त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. तसेच न्यायदान कक्ष, ग्रंथालयाचेही उद्घाटन करण्यात आले. दिवाणी न्यायाधीश अमृता जोशी यांना आसनावर विराजमान करण्यात आले.त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलच्या प्रांगणात झालेल्या समारंभात सरन्यायाधीश गवई म्हणाले की, आजचा महत्त्वाचा आणि ऐतिहासिक क्षण आहे. न्यायमूर्ती म्हणून मला २२ वर्षे पूर्ण झाली आहेत. कोल्हापूर खंडपीठाचे उद्घाटन आणि मंडणगड न्यायालय इमारतीचे उद्घाटन हे दोन्ही कार्यक्रम माझ्या २२ वर्षांतील महत्त्वाचे आहेत. अतिशय कमी वेळेत मंडणगड येथे न्यायालय सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला. त्याच्या भूमिपूजनाला आम्ही दोघेही उपस्थित होतो आणि या उद्घाटन कार्यक्रमालाही आम्ही दोघे उपस्थित आहोत, हा गौरवाचा क्षण आहे, असे ते म्हणाले.
देशात कुठेच अशा इमारती नसतीलअवघ्या २० दिवसांत कोल्हापूर येथील जुन्या इमारतीचा कायापालट करून खंडपीठ सुरू केले. नाशिक, नागपूर, मंडणगड येथील इमारती पाहा. विविध तालुक्यांतील न्यायालयांच्या इमारती, दर्यापूर तालुक्यातील इमारत पाहा. मी अभिमानाने सांगू शकतो, देशातील कुठल्याही तालुक्यामध्ये या स्तराची न्यायालये, एवढ्या सुंदर इमारती असणार नाहीत, असेही सरन्यायाधीश गवई म्हणाले.
बाबासाहेबांचे समानतेचे स्वप्न पूर्ण होईलदिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीमधून समाजाच्या शेवटच्या नागरिकाला कमीत कमी वेळेत, कमीत कमी खर्चात न्याय मिळेल, या दृष्टीने आपण सर्वजण प्रयत्नशील राहाल. जेणेकरून बाबासाहेबांचे सामाजिक आणि आर्थिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल, अशी अपेक्षा सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली.
आंबडवे गावाचा विकास आराखडा तयारमंडणगड तालुक्यातील आंबडवे येथे बाबासाहेब यांच्या मूळगावी बाबासाहेबांचे जागतिक दर्जाचे स्मारक बनविण्यासाठी राज्य सरकार जातीने लक्ष देणार आहे. आंबडवे गावाचा विकास आरखडा तयार झाला असून, त्यानुसार या गावाचा विकास राज्य शासन करणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
Web Summary : Chief Justice Gavai inaugurated Mandangad's new court, emphasizing the constitution's role in India's development. He praised the state's modern court buildings and highlighted efforts to realize Baba Saheb Ambedkar's vision of equality. CM Fadnavis pledged development for Ambedkar's village.
Web Summary : मुख्य न्यायाधीश गवई ने मंडणगड में नए न्यायालय का उद्घाटन किया, भारत के विकास में संविधान की भूमिका पर जोर दिया। उन्होंने राज्य की आधुनिक अदालत भवनों की सराहना की और बाबा साहेब अंबेडकर के समानता के दृष्टिकोण को साकार करने के प्रयासों पर प्रकाश डाला। मुख्यमंत्री फडणवीस ने अंबेडकर गांव के विकास का संकल्प लिया।