चिपळूण : चिपळूण-दसपटी विभागाला जोडणारा पिंपळी येथील पूल शनिवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास मधोमध खचल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुदैवाने कोणतीही दुर्घटना झालेली नाही. या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून, मार्गावरील वाहतूक पेढांबे मार्गाने वळवण्यात आली आहे. सद्य:स्थितीत या पुलाकडील मार्ग बंद करून येथे पाेलिस बंदोबस्त तैनात केला आहे.चिपळूण पिंपळी येथून थेट खडपाेली औद्योगिक वसाहतीला जाण्यासाठी वाशिष्ठी नदीवर हा पूल १९६५ मध्ये बांधण्यात आला होता. काही दिवसांपूर्वी या पुलाला मधोमध तडा गेला होता. ही बाब येथील ग्रामस्थांच्या निदर्शनास येताच त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना कल्पना दिली होती. इतकेच नव्हे तर लेखी पत्र देऊन पूल धोकादायक बनत असल्याचे निदर्शनास आणून दिले होते. त्यानंतर अधिकाऱ्यांनी पाहणी करून किरकोळ स्वरूपात डागडुजी केली होती. मात्र, ती दुरुस्ती शनिवारच्या घटनेने तकलादू असल्याचे स्पष्ट झाले.
गेल्या आठवड्यात मुसळधार काेसळलेल्या पावसामुळे वाशिष्ठी नदीच्या पाण्याच्या प्रवाहाचे हादरे या पुलाला बसत होते. त्यामुळे पुलाच्या मधोमध गेलेला तडा अधिक मोठा हाेऊन पूल मधोमध दुभंगला. शनिवारी सायंकाळी काही ग्रामस्थांच्या निदर्शनास ही परिस्थिती येताच त्यांनी अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती सांगितली हाेती.त्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच प्रांताधिकारी आकाश लिगाडे, तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्यासह प्रशासनातील अनेक अधिकाऱ्यांनी त्याठिकाणी धाव घेतली. तर धोकादायक परिस्थिती बघता ग्रामस्थांनी अगोदरच वाहतूक थांबवून ठेवली होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी तसेच प्रशासनातील अधिकारी व पोलिस काही अंतरावर पाहणी करून चर्चा करत असतानाच दुभंगलेला पूल मधोमध कोसळला आणि एकच धावपळ उडाली.
पूल एमआयडीसीकडे हस्तांतरितहा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाने एमआयडीसीकडे हस्तांतरित केला आहे. पालकमंत्री उदय सामंत यांनी ५ जुलै रोजी चिपळूण येथील सहकार भवनमध्ये खडपोली आणि खेर्डी एमआयडीसी नागरिकांच्या समस्यांबाबत विशेषतः पुलांच्या बांधकामाबाबत बैठक घेतली होती. यावेळी रस्ता, पूल यासाठी २७ कोटी मंजूर केले होते. पावसाळ्यामध्ये निविदा प्रक्रिया पूर्ण करून, पावसाळ्यानंतर काम सुरू झाले पाहिजे. खडपोली आणि खेर्डी एमआयडीसीसंदर्भातील समस्या मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी त्यावेळी दिल्या होत्या.
पेढांबे मार्गे वाहतूक वळवलीया मार्गावरील संपूर्ण वाहतूक पेढांबेमार्गे वळविण्यात आली आहे. प्रशासनातील सर्व अधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी व पोलिस रात्री उशिरापर्यंत येथे ठाण मांडून होते.
स्ट्रक्चरल ऑडिट झालेच नाहीतिवरे धरणफुटीच्या घटनेनंतर या भागातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली होती. मात्र, आजतागायत या पुलाचे स्ट्रक्चरल ऑडिट झाले नसल्याची बाब समाेर आली आहे.