खेड : तालुक्यातील भोस्ते गावात दीड दिवसाच्या गणपती विसर्जनावेळी बेपत्ता झालेल्या भोस्ते येथील मंगेश पाटील या तरुणाचा मृतदेह शुक्रवार २९ रोजी तब्बल २२ तासांनी जगबुडी नदीपात्रात सापडला.तालुक्यातील अलसुरे येथे दीड दिवसाच्या गणपतींचे थाटात विसर्जन सुरू असताना घडलेली दुर्घटना सर्वांनाच हेलावून टाकणारी होती. जगबुडीमध्ये बुडालेल्या मंगेश गुरुवारी बेपत्ता झाला होता. एनडीआरएफच्या जवानांनी अथक शोधमोहीम सुरू ठेवली होती. तब्बल २२ तासांनी त्यांच्या प्रयत्नांना यश आले आणि मंगेश सापडला. मात्र तोपर्यंत त्याची प्राणज्योत मालवली होती. त्यामुळे भोस्ते गावावर शोककळा पसरली.या मोहिमेत एनडीआरएफचे जवान, विसर्जन कट्टा खेडचे अध्यक्ष संतोष शिंदे आणि त्यांचे सहकारी साहिल बुटाला, साईराज साळवी, साईराज खेडेकर, समाधान शिंदे, अविनाश शिंदे, रोहन पाडाळकर, ज्ञानेश भोसले, सुरज शिगवण, तसेच खेड रेस्क्यू टीमचे अध्यक्ष बुरहान टाके व सदस्य बाशीद सुर्वे, रहीम साहिबाले यांनी मंगेशच्या शोधासाठी अपार परिश्रम घेतले.खेड नगर परिषदेचा अग्निशामक विभाग व पोलिस प्रशासनाच्या मदतीने, नगरपालिकेची एक बोट, एनडीआरएफच्या दोन बोटी आणि पोलिसांची एक बोट अशा चार बोटींच्या साहाय्याने नदीत सतत शोध सुरू होता. शुक्रवारी संध्याकाळी ४ वाजण्याच्या सुमारास मंगेशचा मृतदेह सापडला आणि गावकऱ्यांनी हळहळ व्यक्त केली. उत्सवाच्या जल्लोषात अचानक आलेल्या या दुःखद घटनेमुळे भोस्ते गावावर शोककळा पसरली आहे.
Ratnagiri: गणपती विसर्जनाप्रसंगी बेपत्ता झालेल्या मंगेशचा मृतदेह २२ तासांनी हाती
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2025 12:07 IST