बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी, खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा 

By मनोज मुळ्ये | Published: May 3, 2023 06:41 PM2023-05-03T18:41:56+5:302023-05-03T18:42:16+5:30

पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांतने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली.

The Additional Sessions Court of Khed sentenced the person who raped and killed a minor girl to death | बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी, खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा 

बलात्कार करुन अल्पवयीन मुलीचा खून करणाऱ्याला फाशी, खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाने सुनावली शिक्षा 

googlenewsNext

खेड : अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून तिचा निर्घृणपणे खून करत मृतदेह लपवणाऱ्या आरोपी तरुणाला खेड येथील अतिरिक्त सत्र न्यायालयाचे न्यायाधीश डी. एल. निकम यांनी आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावली आहे. सूर्यकांत एकनाथ चव्हाण असे या आरोपीचे नाव असून, बुधवार दि. ३ रोजी न्यायाधिशांनी ही शिक्षा सुनावली आहे.

खेड तालुक्यातील एक अल्पवयीन मुलगी दि. १९ जुलै २०१८ रोजी शाळेतून घरी परत येत असताना अचानक बेपत्ता झाली. खूप शोधाशोध केल्यानंतरही ती न सापडल्याने तिच्या वडिलांनी खेड पोलिस स्थानकात तक्रार दिली होती. पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला.

दि. २० जुलै रोजी या अल्पवयीन मुलीचा केसांना बांधावयाचा पट्टा गावातील एका इसमाच्या घराजवळ काही ग्रामस्थांना दिसला. त्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक अनिल गंभीर व सहायक पोलीस निरीक्षक चंद्रकांत लाड यांनी आरोपी सूर्यकांत नवनाथ चव्हाण (वय २९) याला ताब्यात घेतले. पोलिसांच्या चौकशी अंती सूर्यकांतने गुन्ह्याची कबुली दिली व मृतदेह कुठे लपवला आहे याची माहिती दिली.

खेड पोलिसांनी सूर्यकांतला अटक करून त्याच्याविरुद्ध भारतीय दंड विधान कलम ३०२, ३७६ (आय), ३६३, ३६४, २०१, बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण कायद्यांतर्गत गुन्हा दखल केला.

या खटल्यात तब्बल २८ साक्षीदार तपासण्यात आले. सहायक पोलिस निरीक्षक सुजित गडदे, कर्मचारी सूरज माने, राम नागुलवार यांनी या प्रकरणी सहकार्य केले. सरकारी वकील ॲड. पुष्पराज शेट्ये यांनी केलेला युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपी सूर्यकांतला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायाधीश वर्ग १ डी. एल. निकम यांनी मरेपर्यंत फाशी व आर्थिक दंड अशी शिक्षा सुनावली आहे. हा निकाल ऐकण्यासाठी खेड न्यायालयाच्या आवारात शेकडो ग्रामस्थांनी गर्दी केली होती.

न्याय मिळाल्याने वकिली जीवन सार्थ

अल्पवयीन बालकांवर अत्याचार करणाऱ्या नराधमाना कठोर संदेश देणारा निर्णय आहे. जिल्ह्याच्या न्यायालयीन इतिहासात सुमारे ४५ वर्षांनी मरेपर्यंत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. खेड न्यायालयाची नवीन इमारत झाल्यापासून अशा प्रकारचा निकाल पहिल्यांदाच आला आहे. हा न्याय मिळाला असल्याने वकिली जीवन सार्थकी लागल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया सरकारी वकील पुष्पराज शेट्ये यांनी व्यक्त केली.

Web Title: The Additional Sessions Court of Khed sentenced the person who raped and killed a minor girl to death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.