टंचाईग्रस्त वाड्यांचे रत्नागिरीत त्रिशतक

By Admin | Updated: June 8, 2014 00:55 IST2014-06-08T00:49:22+5:302014-06-08T00:55:35+5:30

आठवड्यात १२ गावांतील ६२ वाड्यांची वाढ

Tertiary trips to scarcity-hit castles | टंचाईग्रस्त वाड्यांचे रत्नागिरीत त्रिशतक

टंचाईग्रस्त वाड्यांचे रत्नागिरीत त्रिशतक

रत्नागिरी : वादळी वाऱ्यासह पावसाने बरसात करूनही जिल्ह्यातील पाणीटंचाई संपुष्टात यायचं नाव काढत नाहीये. उलट ती वाढतच आहे. जिल्ह्यात ११९ गावांतील ३०२ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली आहे. या टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांसाठी प्रशासनाकडून चार टँकर्स वाढविण्यात आले आहेत.
जिल्ह्यात गेल्या १५ ते २० दिवसांत बऱ्यापैकी पाऊस पडला. काही भागात तर दोन ते तीन तास मुसळधारपणे पाऊस बरसला, पण त्यामुळे एकाही वाडीची तहान भागली नाही. उलट मोठ्या संख्येने वाड्या पाणीटंचाईग्रस्त वाड्यांच्या संख्येत सामील होत आहेत.
मागील आठवड्यामध्ये १०७ गावांतील २४० वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरू होती. या टंचाईग्रस्तांना शासकीय १२ आणि खासगी १० टँकर अशा एकूण २४ टँकर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत होता़ आठवडाभराच्या कालावधीत यामध्ये १२ गावांतील ६० वाड्यांची भर पडली. या टंचाईग्रस्तांसाठी केवळ ४ टँकर्सची वाढ करण्यात आली आहे.
मंडणगड व रत्नागिरी या तालुक्यांमध्ये चालू आठवड्यात एकाही गावाची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झालेली नाही. दापोली व लांजा या दोन तालुक्यांमध्ये प्रत्येकी एका वाडीची टंचाईग्रस्तांमध्ये वाढ झाली. गुहागरमध्ये ४ गावांतील २१ वाड्यांची, खेडमध्ये २ गावांतील ६ वाड्यांची, चिपळूणमध्ये ३ गावांतील ११ वाड्यांची आणि संगमेश्वरमध्ये एक गावातील १६ वाड्यांची, तर राजापुरात एका गावातील सहा वाड्यांची टंचाईग्रस्तांमध्ये भर पडली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात गावे आणि वाड्यांची आठवडाभरात वाढ झालेली आहे.
जिल्ह्यात चालू आठवड्यामध्ये मागील आठवड्यापेक्षा टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांच्या संख्येत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. (शहर वार्ताहर)
 

Web Title: Tertiary trips to scarcity-hit castles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.