दहा उमेदवारांचे अर्ज अवैध
By Admin | Updated: September 30, 2014 00:13 IST2014-09-30T00:12:52+5:302014-09-30T00:13:05+5:30
महत्त्वाचे उमेदवार ‘सेफ’: उद्या उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत

दहा उमेदवारांचे अर्ज अवैध
रत्नागिरी : विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज भरलेल्या जिल्ह्यातील ६५ उमेदवारांपैकी दहा उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले असून, ५५ उमेदवार सध्या निवडणूक रिंगणात आहेत. बुधवारी (दि. १ ) उमेदवारी मागे घेण्याची अंतिम मुदत असल्याने नेमक्या लढती कशा आणि कोणामध्ये होणार, हे त्याच दिवशी स्पष्ट होणार आहे.
अर्ज भरण्यास २० आॅक्टोबरपासून प्रारंभ झाला. मात्र, सुरुवातीचे तीन दिवस काही पक्षांचे उमेदवार निश्चित न झाल्याने अर्ज भरले गेले नाहीत. मंगळवार (दि. २३) पासून ही सुरुवात झाली. त्यानंतर बुधवारी (दि.२४) जिल्ह्यातील तीन उमेदवारांनी अर्ज दाखल केले. दि. २५ रोजी पाच , २६ रोजी १७, तर २७ रोजी तब्बल ४१ अर्ज दाखल झाले होते. त्यामुळे दापोली मतदारसंघात १८ उमेदवार, गुहागरमध्ये आठ उमेदवार, चिपळूणमध्ये १३ उमेदवार, रत्नागिरीमध्ये १३ उमेदवार आणि राजापूरमध्ये १२ उमेदवारांनी अर्ज भरले.
आज, सोमवारी या सर्व अर्जांची छाननी त्या-त्या प्रांत कार्यालयात करण्यात आली. यावेळी रत्नागिरीतील अॅड. बाबा परुळेकर (भाजप), गुहागरमधून प्रशांत शिरगावकर (भाजप), सुरेश कातकर (भारतीय राष्ट्रीय काँग्रेस), दापोलीतील किशोर देसाई (राष्ट्रवादी), प्रवीण कोलगे (शेकाप), श्रद्धा दळवी (शिवसेना), बाळासाहेब बेलोसे (काँग्रेस), चिपळूणमधील अशोक जाधव (काँग्रेस) आणि राजापुरातील रूपेश गांगण (भाजप), संदीप कांबळे (रिपाइं) यांचे अर्ज अवैध ठरले आहेत.
आता दापोली मतदारसंघातील १५, गुहागरामधील ६, चिपळूणमधील १२, रत्नागिरीतील १२ आणि राजापुरातील १०, असे एकूण ५५ उमेदवार रिंगणात आहेत. १ आॅक्टोबरला अर्ज मागे घेण्याची अंतिम तारीख असल्याने यापैकी कोण माघार घेणार आणि कोण निवडणूक लढविणार, हे चित्र स्पष्ट होणार असल्याने सर्वांचेच लक्ष या दिवसाकडे लागले आहे. (प्रतिनिधी)
४पाचही मतदारसंघांतील प्रमुख असे सर्वच उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहेत. कोणत्याही महत्त्वाच्या उमेदवाराचा अर्ज अवैध ठरलेला नाही. दापोलीत किशोर देसाई यांनी राष्ट्रवादीकडून आणि अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यातील पक्षाचा अर्ज बाद झाला असला तरी अपक्ष म्हणून ते रिंगणात आहेत.