धबधब्यावरील सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:30 IST2021-09-13T04:30:16+5:302021-09-13T04:30:16+5:30
रानपाट (रत्नागिरी) येथील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी भुरळ घालत आहे. मेहरून नाकाडे लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पावसाळी पर्यटनाचा मोह ...

धबधब्यावरील सेल्फीचा मोह जिवावर बेतू शकतो
रानपाट (रत्नागिरी) येथील धबधबा पावसाळी पर्यटनासाठी भुरळ घालत आहे.
मेहरून नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : पावसाळी पर्यटनाचा मोह आवरता येत नसल्यामुळे आपसूक पावले निसर्गनिर्मित धबधब्याकडे वळतात. कोरोनामुळे शासकीय निर्बंध लावण्यात आल्याने धबधब्यावरील गर्दी सध्या तरी थांबली आहे. मात्र उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यात भिजताना तसेच धबधब्यासमोर उभे राहून सेल्फी काढण्याचा आनंद वेगळा असतो. अशा वेळी पाय घसरून पडण्याचा धोका असल्याने सेल्फी जिवावर बेतू शकते.
डाेंगरातून उंचावरून सतत कोसळणारे पाणी नदी, ओढ्याला मिळते. साहजिकच पाण्याचा प्रवाह अधिक असतो. पाण्यामुळे दगडावर शैवाल आल्याने पाय घसरण्याचा धोका आहे. पाण्यात भिजण्याचा आनंद घेत असताना जीव गमावल्याच्या दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे पावसाळी सहलीचा आनंद घेताना, सावधानता गरजेची आहे. सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
सूचनांकडे होते दुर्लक्ष
n धबधब्याच्या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्थांनी सूचना फलक लावले आहेत.
n सूचनाफलक असतानाही त्यावरील सूचनांचे पालन केले जात नाही
n मित्रमंडळीसमवेत माैजमस्ती करताना, सूचनांचा पडतो विसर
n उंचावरून पाणी पडत असल्याने अंदाज घेऊनच पुढे जावे, मात्र तसे होत नाही.
सावधानता बाळगावी
कुटुंबासह सहलीसाठी बाहेर पडत असताना सहलीचा आनंद घेता यावा, यासाठी सावधानता, सुरक्षितता बाळगणे गरजेचे आहे. शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे फलक स्थानिक स्वराज्य संस्थेतर्फे गर्दी होणाऱ्या धबधब्याच्या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र त्याचे पालन करण्याचा विसर पडतो. त्यामुळे दुर्घटना घडतात.
- मारूती जगताप, पोलीस निरीक्षक, रत्नागिरी ग्रामीण
कोरोनामुळे निर्बंध
निवळीचा धबधबा
रत्नागिरी शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर निवळी गाव असून लोकवस्तीपासून दूरवर हा धबधबा आहे. मात्र गावातूनच धबधब्याकडे जाण्यासाठी मार्ग खडतर व जंगलमय आहे. निवळीसह रानपाट, निवेंडी पानवल गावात धबधबे असून कोरोनामुळे जाण्यास मनाई आहे.
उक्षीचा धबधबा
रत्नागिरी तालुक्यातील व शहरापासून २० ते २२ किलोमीटर असलेल्या उक्षी गावातील धबधब्याचेही आकर्षण असले तरी धबधब्यावर जाण्याचा मार्ग गावातून जातो. कोरोनामुळे धबधब्यावरील गर्दी टाळण्यासाठी बंदी असल्याने पावसाळी भिजण्याचा आनंद घेणे अशक्य होत आहे.