दापोली : शिक्षकांची जुनी पेन्शन, तसेच जाचक अटी असलेला २०२४ चे परिपत्रक रद्द करण्यासाठी, शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त कामे लावू नयेत, यासाठी आपण मुख्यमंत्री यांच्याकडे पाठपुरावा करणार आहे. शिक्षकांनी राजकारण बाजूला ठेवून सरकारला सहकार्य करावे, त्यातून नक्कीच तोडगा निघेल, असा विश्वास राज्याचे उद्याेगमंत्री आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केला.दापोलीतील शिंदे सभागृहात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष विजय काेंबे यांच्या अध्यक्षतेखाली कोकण विभागीय मेळावा पार पडला. यावेळी मंत्री सामंत बाेलत हाेते. ते म्हणाले की, हागणदारीमुक्त गाव झालाय की नाही याची जबाबदारी शिक्षकांवर टाकली. त्यावेळी निघालेल्या मोर्चात सहभागी होणारा मी एकमेव लोकप्रतिनिधी होतो. शिक्षकांची बिनापैशांची वकिली मी स्वीकारतो, फक्त त्या वकिलीची किंमत मला राजकारणात मोजावी लागणार नाही याची जबाबदारी शिक्षकांनी घ्यावी, असे ते म्हणाले.शिक्षकांना शिक्षणाव्यतिरिक्त काम लावण्यास माझा नेहमीच विरोध राहिलाय, आपण नेहमीच शिक्षकांच्या बाजूने आहोत. त्यामुळे शिक्षकांवर अन्याय होऊ देणार नाही. महायुतीचे सरकार शिक्षकांना वाऱ्यावर सोडणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
तीन प्रमुख मागण्यांसाठी उपमुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांच्यासोबत बैठकीत तोडगा काढला जाईल, असे मंत्री योगेश कदम यांनी सांगितले. तर शिक्षक आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनीही आपण शिक्षकांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी कटिबद्ध असल्याचे सांगितले. कोकण विभाग अध्यक्ष अंकुश गोफणे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. संताेष पावणे यांनी सूत्रसंचालन, तर रूपेश जाधव यांनी आभार प्रदर्शन केले.
शाळा बंद हाेणे अशाेभनीयकोणतीही शाळा बंद होणे ही काय शोभनीय बाब नाही. कोणतीही शाळा बंद पडणार नाही, तसेच आपल्या कोकण विभागासाठी डोंगरी निकष कसे लागू होतील यासाठी प्रयत्नशील राहू, असे मंत्री सामंत यांनी सांगितले.दोन दिवसात बैठक घेऊविविध मागण्यांसंदर्भात राज्य शिक्षक समितीच्या भूमिकेशी मी सहमत असून, शिक्षकांनी शाळेच्या गावात २४ तास उपस्थित असणे अपेक्षित नसून, शालेय कामकाजासाठी वेळेत उपस्थित असणे गरजेचे आहे. आपण दोन दिवसांत आपल्या प्रश्नांसंदर्भात संबंधित मंत्र्यांसाेबत बैठक घेऊ, असे आश्वासन त्यांनी दिले.