शिक्षकांनीच वाजविली घंटा

By Admin | Updated: November 7, 2015 22:43 IST2015-11-07T22:34:06+5:302015-11-07T22:43:39+5:30

शासनाला ‘झोपमोड’चा इशारा : बचाव कृती समितीचे आंदोलन

Teachers played bell | शिक्षकांनीच वाजविली घंटा

शिक्षकांनीच वाजविली घंटा

रत्नागिरी : शासनाच्या शिक्षणविरोधी धोरणाच्या निषेधार्थ स्थापन करण्यात आलेल्या शिक्षण बचाव कृती समितीच्या येथील जिल्हा शाखेतर्फे शनिवारी दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ‘घंटानाद’ आंदोलन करण्यात आले.
चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांसाठी लागू केलेला आकृतिबंध, शिक्षक भरतीवर बंदी, संस्थाचालकांचे मूलभूत अधिकार काढून घेणे, शिक्षकांचा अशैक्षणिक कामांचा बोजा वाढविणे, महाराष्ट्रातील शिक्षण व्यवस्था अस्थिर करणे, कला व क्रीडा शिक्षकांची पदे कमी करणे, असे अनेक निर्णय शासन घेत आहे. हे निर्णय शिक्षकांसाठी जाचक असल्याने शिक्षण क्षेत्रातील सर्व संघटना एकवटल्या असून, शासनाविरोधात टप्प्याटप्प्याने आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार आज पहिल्या टप्प्यातील ‘घंटानाद’ आंदोलन प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी करण्यात आले.
यावेळी शिक्षण बचाव कृती समितीत सहभागी असलेल्या विविध संघटनांचे २०० शिक्षक प्रतिनिधी उपस्थित होते. यावेळी सर्व शिक्षकांनी घंटानाद करत शासनाचा निषेध केला. यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी आपल्या मागण्यांसदर्भात चर्चा केली. जिल्हाधिकारी यांनी समितीच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवू, असे सांगितले.
या शिष्टमंडळात संस्था संघटनांचे अ‍ॅड. विलास पाटणे, श्रीराम भावे, एन. जे. पाटील, प्रमोद दळी, विजय पाटील, भारत घुले, शोभा तांबे, जिल्हाध्यक्ष एकनाथ मोरे, गजानन पाटणकर, शिक्षक भारतीचे धनाजी बेंद्रे, अनिल उरणकर, रघुनाथ आडिवरेकर, रामचंद्र केळकर, आदींचा समावेश होता. हे आंदोलन पाच टप्प्यांत होणार आहे. या आंदोलनाची दखल शासनाने न घेतल्यास दि. १४ रोजी झोपमोड आंदोलन करण्यात येणार असल्याचे या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)

Web Title: Teachers played bell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.