अध्यापक संघाचे उद्या राज्यस्तरीय आंदोलन!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 1, 2015 22:32 IST2015-10-01T22:32:19+5:302015-10-01T22:32:19+5:30
शिक्षणमंत्र्यांचा निषेध : शिक्षकवर्गात संताप

अध्यापक संघाचे उद्या राज्यस्तरीय आंदोलन!
टेंभ्ये : महाराष्ट्र राज्य माध्यमिक शिक्षक संघाच्यावतीने शनिवार, दि. ३ आॅक्टोबर रोजी राज्यस्तरीय आंदोलन करण्यात येणार आहे. राज्याचे शिक्षणमंत्री शिक्षकांना कामचुकार असे संबांधले, तर मुख्याध्यापकांना जेलमध्ये टाकण्याचे वक्तव्य केले, या त्यांच्या वक्तव्याचा निषेध आंदोलनप्रसंगी केला जाणार आहे. शिक्षकांच्या विविध समस्यांकडे शासन जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याच्या निषेधार्थ दुपारी २ ते सायंकाळी ५ या वेळात धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून अध्यापक संघ काही महत्त्वपूर्ण मागण्या समोर ठेवणार आहे. शाळांची संरचना व संचमान्यतेबाबतचा २८ आॅगस्टचा शासन निर्णय त्वरित रद्द करावा, या निर्णयाच्या अंमलबजावणीमुळे राज्यातील शिक्षणक्षेत्रामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. पायाभूत चाचणी क्रमाक्रमाने पहिली ते आठवीच्या वर्गासाठी घेण्यात यावी, अन्यायकारक अंशदायी पेन्शन योजना रद्द करावी, शिक्षकेतर कर्मचारी आकृतीबंधाबाबत शासनाने नियुक्त केलेल्या समितीच्या अहवालानुसार कार्यवाही करावी, भरतीवरील बंदी उठवून सर्व संवर्गातील पदे त्वरित भरावीत, २०१३ - १४च्या संचमान्यतेनुसार कमी करण्यात आलेल्या शिक्षणसेवकांना सेवेत रुजू करण्यात यावे, अशा मागण्या आहेत. (वार्ताहर)
महाराष्ट्र शासनाची नवीन धोरणे म्हणजे माध्यमिक शाळा बंद करण्याचे षड्यंत्र आहे. राज्यातील गरीब व सर्वसामान्य कुटुंबातील गरजू विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळणे आवश्यक आहे. परंतु, शासन माध्यमिक शाळा बंद करुन इंग्रजी माध्यमाच्या खासगी शाळांना प्रोत्साहन देत आहे. २८ आॅगस्टसारख्या सुलतानी शासन निर्णयाची अंमलबजावणी झाल्यास राज्यातील माध्यमिक शिक्षक पेटून उठतील.
- ज्ञानेश्वर कानडे राज्याध्यक्ष, अध्यापक संघ
माध्यमिक अध्यापक संघाच्यावतीने ३ आॅक्टोबर रोजी शासनाच्या अन्यायकारक धोरणाविरोधात धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. शिक्षणमंत्र्यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा या आंदोलनाच्या माध्यमातून जाहीर निषेध करण्यात येणार आहे.
- भारत घुले, अध्यक्ष, जिल्हा अध्यापक संघ