शिक्षकाने विष पाजल्याची विद्यार्थ्याची तक्रार
By Admin | Updated: July 7, 2015 23:04 IST2015-07-07T23:04:46+5:302015-07-07T23:04:46+5:30
दापोली पोलीस स्थानकात आजोबा अन्वर रखांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे.

शिक्षकाने विष पाजल्याची विद्यार्थ्याची तक्रार
दापोली : दापोली शहरातील रामराजे इंटरनॅशनल स्कूल येथे इयत्ता तिसरीमध्ये शिक्षण घेणाऱ्या बसाम सुलतान मुल्ला (८) या विद्यार्थ्याला शाळेच्या प्राचार्याने विषारी द्रव्य पाजल्याची घटना २ जुलै रोजी घडल्याची फिर्याद दिली आहे. त्याच दिवशी रात्री ८ च्या सुमारास त्रास जाणवू लागल्याने त्याला अधिक उपचारासाठी डेरवण येथे दाखल करण्यात आले होते. या विद्यार्थ्याची प्रकृती स्थिर असून, शाळेचे प्राचार्य शेखर रामचंद्र पाटील यांच्याविरुद्ध भादंवि ३२८ नुसार दापोली पोलीस स्थानकात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मात्र, प्राचार्याने आपण कोणतेही औषध पाजले नसल्याचे सांगून इन्कार केला आहे.
रामराजे इंटरनॅशनल स्कूलमध्ये बसाम मुल्ला सकाळी ९.३० वाजता स्कूल बसने शाळेत गेला. त्याचा रमजानचा रोजा होता. सायंकाळी ४ वाजता कराटे खेळून झाल्यानंतर त्याच्या पायाला दुखापत झाली. डावा पाय दुखू लागल्याने प्राचार्य शेखर पाटील यांनी प्रयोगशाळेत नेऊन त्याला जबरदस्तीने विषारी द्रव्य प्यायला दिल्याची फिर्याद अन्वर रखांगे यांनी दिली आहे.
बसाम मुल्ला नेहमीप्रमाणे ५ वाजता घरी आला. थोडावेळ सायकल चालवून झोपला. सायंकाळी ६.४५ वाजण्याच्या सुमारास पोट दुखू लागल्याने तो रडायला लागला. आई बुशरी महमद सुलतान मुल्ला यांनी त्याला विचारले असता पाटीलसरांनी शाळेत मला औषध दिल्याचे सांगितले. त्याला तत्काळ दापोली शहरातील मुनीर सरगुरो डॉक्टर यांच्याकडे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी त्याला विषबाधा झाल्याचे सांगितले. त्याला तत्काळ डेरवण येथे हलवण्यात आले. डेरवण येथे उपचार सुरु झाल्यावर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला असता आपल्याला पाटीलसरांनी जबरदस्तीने औषध पाजले असल्याचे बसाम याने सांगितले. त्याच्या पोटातून १५० मिली आॅरगॅनो फास्फेट नावाचे विषारी द्रव्य बाहेर काढण्यात डेरवण येथील डॉक्टरांना यश आले आहे.बसाम याचे वडील सुलतान मुल्ला नोकरीनिमित्त दुबई येथे असतात. आई व दोन मुले दापोली शहरातील काळकाईकोंड फातिमा मंजील येथे भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहतात. परंतु रमजान असल्याने गेले काही दिवस ते अन्वर रखांगे यांच्या घरी राहतात. बुरारी मुल्ला ही रखांगे यांची मुलगी आहे. त्यामुळे ती रमजान होईपर्यंत आपल्या मुलास माहेरी ठेवून गेली. परंतु १५ रोजी हा प्रकार घडल्यामुळे त्या घाबरुन गेल्या असल्याचे नातेवाईकांचे म्हणणे आहे.
दापोली पोलीस स्थानकात आजोबा अन्वर रखांगे यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन तक्रार दाखल करुन घेण्यात आली आहे. मात्र, या घटनेचे नेमके रहस्य काय आहे, याचा पोलीस कसून तपास करत आहेत. पाच दिवस डेरवण येथे उपचार घेतल्यानंतर उद्या बुधवारी बसाम दापोलीत येणार आहे. त्यामुळे पुन्हा त्याची साक्ष नोंदवून घेऊन या विषारी द्रव्यमागे काय दडलंय, याचा पर्दापाश दापोली पोलीस करणार आहेत. प्राप्त फिर्यादीवरुन शेखर पाटील यांच्याविरूद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असला तरी आपण कसल्याही प्रकारचे औषध पाजले नाही व संपूर्ण दिवसभर त्या मुलाचा संपर्कसुद्धा झाला नाही. मी त्या दिवशी वर्गात गेलोच नाही, असे पाटील यांनी पोलिसांना दिलेल्या जबानीत म्हटल्यामुळे विषारी द्रव्याचे गूढ अजून वाढण्याची शक्यता आहे.
दापोलीचे पोलीस निरीक्षक, सहाय्यक उपनिरीक्षक सी. जी. कांबळे यांनी या घटनेचा कसून तपास सुरु केला असून, लवकरच सत्य बाहेर येईल, असे पोलिसांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)
रामराजे इंटरनॅशनल स्कूलमध्ये २ जुलै रोजी प्रकार घडल्यानंतर त्याच दिवशी पालकांनी फिर्याद दिली होती.
दापोली पोलिसांनी दोनवेळा बसामचा घेतला जबाब. जबाबात पाटील यांनीच औषध पाजल्याचा केला उच्चार.
चिपळूणचे उपविभागीय पोलीस अधिकारी गावडे यांची दापोली पोलीस स्थानकाला भेट.
विषारी द्रव्य प्रकरणाची केली विचारपूस.
दोषी व्यक्तींवर कठोर कारवाईचे आदेश.