खेडमध्ये टँकरने पाणीपुरवठा बंद; नळपाणी योजना कार्यान्वित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 05:07 IST2021-09-02T05:07:38+5:302021-09-02T05:07:38+5:30
खेड : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नळपाणी योजना नादुरूस्त झाल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ ...

खेडमध्ये टँकरने पाणीपुरवठा बंद; नळपाणी योजना कार्यान्वित
खेड : तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक नळपाणी योजना नादुरूस्त झाल्याने ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाण्यासाठी दाहीदिशा फिरण्याची वेळ आली होती. तालुक्यातील ८ गावांमध्ये पर्यायी व्यवस्था म्हणून दोन शासकीय व ४ खासगी टँकरद्वारे ग्रामस्थांना पाणीपुरवठा सुरू करण्यात आला होता. मात्र, नादुरूस्त नळपाणी योजनांची दुरूस्ती करून त्या कार्यान्वित झाल्याने ८ गावांमध्ये धावणाऱ्या टँकर्सना ब्रेक लागला आहे.
तालुक्यातील पोसरे-खुर्द येथे कोसळलेल्या दरडीमुळे १७ जण गाडले गेले. बिरमणी येथेही दरड कोसळून दोघांचा मृत्यू झाला. या दोन गावांसह अन्य ठिकाणी कोसळलेल्या दरडींमुळे नळपाणी योजना नादुरूस्त झाल्या होत्या. पोसरे-बौद्धवाडीसह भोस्ते, खोपी, धामणंद, चोरवणे, आंबडस, शिव, बोरघर याठिकाणी टँकरने पाणीपुरवठा करून ग्रामस्थांना दिलासा देण्यात आला होता. या ८ गावांसह तालुक्यात ९५ नळपाणी पाणीपुरवठा योजना नादुरूस्त झाल्या आहेत. तालुक्यातील आठ गावांमधील नादुरूस्त नळपाणी योजनांमुळे ऐन पावसाळ्यात पाणीप्रश्न ऐरणीवर आला होता. या ८ गावांना २५ जुलैपासून टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत होता. पाण्यावाचून ग्रामस्थांचे हाल होणार नाहीत याकडे प्रशासनाने विशेष लक्ष केंद्रीत केले होते. त्यामुळे ऐन पावसाळ्यात ग्रामस्थांना टँकरच्या पाण्यावर तहान शमवण्याची वेळ आली होती.
या पार्श्वभूमीवर नळपाणी योजनांची तातडीने दुरुस्ती करून दिलासा देण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत होती. प्रशासकीय पातळीवरून या ८गावांमध्ये नळपाणी योजनांची तातडीने दुरूस्ती करण्याच्या हालचाली सुरू झाल्या होत्या. याचमुळे नळपाणी योजनांची दुरूस्ती होऊन योजनाही कार्यान्वित झाल्याने ८ गावांना भेडसावणारा पाणीप्रश्न संपुष्टात आला आहे. याचमुळे २६ ऑगस्टपासून ८ गावांमध्ये धावणाऱ्या टॅंकर्सना अखेर ब्रेक लागला आहे. पाणीटंचाईची समस्या कायमची मिटल्याने ८ गावांतील ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.