निलंबन मागे घ्या, अन्यथा काम बंद आंदोलन चालूच

By Admin | Updated: June 7, 2014 00:44 IST2014-06-07T00:40:05+5:302014-06-07T00:44:10+5:30

अभियंत्यांचा इशारा : कारवाई हेतुपुरस्पर आरोप

Take the suspension back, otherwise stop the work-off movement | निलंबन मागे घ्या, अन्यथा काम बंद आंदोलन चालूच

निलंबन मागे घ्या, अन्यथा काम बंद आंदोलन चालूच

रत्नागिरी : मंडणगड तालुक्यातील जिल्हा परिषदेचे अभियंता आर. बी. घस्ते व एस. एन. आनंदे यांच्यावर करण्यात आलेली निलंबनाची कारवाई हेतुपुरस्सर झाली असल्याने ती तत्काळ मागे घेण्यात यावी, अन्यथा अभियंत्यांचे कामबंद आंदोलन चालूच ठेवू, असा इशारा अभियंत्यांनी दिला आहे.
मंडणगडमधील पालघर येथील ठेकेदार नियाज पठाण यांनी काही दिवसांपूर्वी आत्महत्या केली होती. पठाण यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहून आपल्या कामाची बिले अभियंत्यांनी थकवल्याने आपण आत्महत्या करत असल्याचे म्हटले होते. त्यामुळे जिल्हा परिषदेने अभियंता आर. बी. घस्ते व आनंदे यांना निलंबित केले आहे. त्यामुळे अभियंता संघटना आक्रमक झाली आहे.
याबाबतचे निवेदन जिल्हा परिषद अभियंता संघटनेने आज, शुक्रवारी मुख्य कार्यकारी अधिकारी, बांधकाम सभापतींना दिले. यावेळी अभियंत्यांनी बांधकाम सभापती अजित नारकर यांच्याशी निलंबन मागे घेण्याबाबत चर्चा केली. सभापती नारकर यांनीही आपण अभियंत्यांच्या पाठीशी असून, याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांशी चर्चा करणार असल्याचे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमोर स्पष्ट केले.
बांधकाम विभागाचे अभियंता आर. बी. घस्ते व ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे अभियंता एस. एन. आनंदे यांची कोणतीही चूक नसताना त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली आहे. निलंबनाची कारवाई करण्यापूर्वी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारची वस्तुस्थिती विचारात न घेता केवळ हेतुपुरस्सर कारवाई केल्याची धारणा संघटनेने व्यक्त केली आहे.
चिपळूण येथे संघटनेचे राज्याध्यक्ष संजय देसाई व संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या सभेमध्ये जोपर्यंत दोन्ही अभियंत्यांवरील कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत जिल्ह्यातील सर्व अभियंते कार्यालयात उपस्थित राहतील.
मात्र, कामकाजात सहभागी होणार नाहीत, असा निर्णय घेण्यात आल्याचेही या निवेदनाद्वारे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अभियंता संघटनेने कळविले आहे.
दरम्यान, यामुळे नियाज आत्महत्याप्रकरण गंभीर वळण घेऊ लागले आहे. एकीकडे अभियंत्यांच्या निलंबनासाठी स्थानिक ग्रामस्थांनी दबाव टाकला असताना, कारवाईनंतर अभियंता संघटनेने आक्रमक धोरण स्वीकारल्यानंतर जिल्हा परिषद प्रशासन मात्र दुहेरी कचाट्यात सापडले आहे. (शहर वार्ताहर)

 

Web Title: Take the suspension back, otherwise stop the work-off movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.