प्राध्यापकावर कठोर कारवाई करा
By Admin | Updated: July 22, 2015 23:57 IST2015-07-22T22:16:44+5:302015-07-22T23:57:33+5:30
गुहागर तालुका : अभाविपने केला निषेध

प्राध्यापकावर कठोर कारवाई करा
रत्नागिरी : गुहागर तालुक्यात घडलेल्या ‘त्या’ प्रकाराचा अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेकडून निषेध करण्यात येत आहे. आरोपी प्राध्यापकावर संस्था आणि शासनाकडून कठोर कारवाई करण्यात यावी, यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन् बी, जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांच्याकडे निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती अखिल भारतीय विद्यार्थी परिषद महाराष्ट्र प्रदेशमंत्री अॅड. विवेकानंद उजळंबकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.विद्यार्थी परिषदेतर्फे २०१५-२०१६ शैक्षणिक वर्ष डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १२५वी जयंती वर्ष म्हणून साजरा करण्यात येणार आहे. यावर्षी महाराष्ट्रात विद्यापीठाच्या सिनेट निवडणुका, विद्यार्थी परिषदेच्या खुल्या निवडणूका होत असून, विद्यार्थी परिषद यावर्षी देशभरातील शिक्षण घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना राष्ट्रीय प्रवाहात सक्रीय करून सदस्यत्व देण्यात येणार आहे. १५ जुलैपासून सदस्य नोंदणी अभियान सुरू झाले असून, ३० आॅगस्टपर्यंत चालणार आहे. ५ आॅगस्ट रोजी अधिकाधिक नोंदणी, तर २९ आॅगस्ट रोजी फक्त विद्यार्थिनींची नोंदणी करण्यात येणार असल्याचे अॅड. उजळंबकर यांनी सांगितले.
महाविद्यालयातील निवडणुका १९९३पासून बंद आहेत. त्या सुरू होण्यासाठी अभाविपने निवेदन दिले आहे. यामुळे घराणेशाहीला आळा बसेल. मात्र, निवडणुका राजकारणविरहीत होणे गरजेचे असल्याचे सांगितले.
मुंबई उपकेंद्र निष्क्रीय असल्याचा आरोप करीत क्षुल्लक कारणासाठी विद्यार्थ्यांना मुंबईपर्यंत पळवत आहे. शिवाय उशिरा निकाल ही समस्या आहे. त्यामुळे कोकणासाठी स्वतंत्र विद्यापीठाची मागणी करण्यात येणार आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे शिष्टमंडळ कुलगुरूंशी चर्चा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. मुंबई विद्यापीठाबाबत विद्यार्थ्यांच्या तक्रारी वाढत असून त्यामुळे कोकणसाठी स्वतंत्र विद्यापीठ हवे, असे ते म्हणाले.
दापोलीतील घटनेबाबत अभाविप दोन दिवसात आपली भूमिका स्पष्ट करेल, असेही अॅड. उजळंबकर यांनी सांगितले. यावेळी शहराध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, शहरमंत्री आशिष बर्वे उपस्थित होते. (प्रतिनिधी)
मुंबई विद्यापीठ निष्क्रीय.
क्षुल्लक कारणासाठी मुंबईपर्यंत करावी लागतेय वारी, उशिरा निकालाचीही समस्या.
कोकणसाठी स्वतंत्र मागणी करणार : उजळंबकर
रत्नागिरी-सिंधुदूर्गातील शिष्टमंडळ कुलगुरुंशी चर्चा करणार.
दापोलीतील घटनेबाबत लवकरच भूमिका मांडणार.